परभणी : ग्रामपंचायतमधील अभिलेखे जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:40 IST2018-11-29T00:39:51+5:302018-11-29T00:40:12+5:30
तालुक्यातील मुळी ग्रामपंचायत कार्यालयातील अभिलेखे जाळल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेने वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे़

परभणी : ग्रामपंचायतमधील अभिलेखे जाळले
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मुळी ग्रामपंचायत कार्यालयातील अभिलेखे जाळल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेने वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे़
मुळी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार काही ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती़ या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतमधील संपूर्ण अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आदेश दिले होते़ २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विस्तार अधिकारी भालेराव यांनी तशी सूचना ग्रामसेवक नवटंके यांना देऊन बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे सांगितले़ मात्र बुधवारी सकाळीच ही घटना समोर आल्याने वेगवेगळ्या चर्चा होत आहेत़ ग्रामपंचायतमधील सेवक सकाळी कार्यालयात आल्यानंतर त्यांना ग्रामपंचायतीचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले़ आत जावून पाहणी केली असता कपाटाची दारे उघडे होती़ आतील दस्ताऐवज गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आजुबाजूला पाहणी केली़ तेव्हा कार्यालयाच्या बाहेरील पिंपळाच्या झाडाखाली दस्ताऐवज जळालेल्या अवस्थेत त्यांना दिसले़ ही माहिती ग्रामसेवक नवटंके यांना दिली़ नवटंके यांनी कार्यालयात येऊन पाहणी केली असता कार्यालयातील संगणक संचही गायब झाल्याचे आढळून आले़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़