परभणी: मनपाच्या २४ लाखांच्या प्रस्तावास दिली मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:01 IST2019-05-15T00:00:51+5:302019-05-15T00:01:21+5:30
चालू वर्षातील टंचाई कालावधीत उपाययोजना करण्यासाठी परभणी महानगरपालिकेच्या २३ लाख ७५ हजार रुपयांच्या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले.

परभणी: मनपाच्या २४ लाखांच्या प्रस्तावास दिली मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : चालू वर्षातील टंचाई कालावधीत उपाययोजना करण्यासाठी परभणी महानगरपालिकेच्या २३ लाख ७५ हजार रुपयांच्या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील आदेश सोमवारी काढण्यात आले.
परभणी महानगरपालिकेने २०१८-१९ या वर्षातील पाणीटंचाई कालावधीत कामे करण्यासाठीचा प्रस्ताव औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. सदर प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे सादर केला. त्यामध्ये विहिरीतील गाळ काढणे, खोलीकरण आणि त्या अनुषंगिक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजुरी दिली आहे. ही मंजुरी देत असताना मनपासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये या प्रस्तावांच्या खर्चाच्या ९० टक्के म्हणजेच २० लाख ४७ हजार रुपयांचे अनुदान शासन देणार असून उर्वरित १० टक्के म्हणजेच २ लाख २८ हजार रुपयांची रक्कम मनपाला लोकवर्गणीतून भरावयाची आहे. ही रक्कम मनपाने विभागीय आयुक्तामार्फत खर्ची टाकल्यानंतरच पूर्ण रक्कम शासन वितरित करणार आहे. या संदर्भातील कामांची निविदा प्रक्रिया २९ मे पर्यंत पूर्ण करुन कार्यादेश देणे आवश्यक आहे. २९ मे पर्यंत याबाबतची कारवाई पूर्ण न झाल्यास योजनेची मान्यता रद्द समजण्यात येईल, असेही या संदर्भातील आदेशात नमूद केले आहे. पाणीपुरवठा योजनेची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करुन पाणीपुरवठा सुरु होणे आवश्यक असून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी याबाबतचा प्रगती अहवाल शासनास सादर करावा, असेही या आदेशात नमूद केले आहे.