परभणी : ९ गावांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:14 IST2019-03-27T00:12:28+5:302019-03-27T00:14:22+5:30
मार्च महिन्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज बिलासंदर्भात कडक मोहीम राबविण्यात येत असून सव्वा कोटी रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी तालुक्यातील नऊ गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

परभणी : ९ गावांचा वीजपुरवठा खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : मार्च महिन्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज बिलासंदर्भात कडक मोहीम राबविण्यात येत असून सव्वा कोटी रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी तालुक्यातील नऊ गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी, ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
वीज वितरण कंपनीने पूर्णा शहर व ग्रामीण भागामधील वीज बिल वसुली मोहीम सुरू केली आहे. यासाठी विविध भागांत पथक तयार केले असून या पथकाच्या माध्यमातून वीज बिल वसुली करण्यात येत आहे. मागील एक वर्षापासून वीज बिल न भरणाऱ्या गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये सिरकळस, माखणी, खांबेगाव, धानोरा मोत्या, चांगेफळ, कंठेश्वर, आजदापूर, कानखेड- १, कानडखेड -२ या नऊ गावांचा मागील आठवड्यापासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून या नऊ गावांमध्ये वीज बिलापोटी १ कोटी ३० लाख रुपये थकित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पाणीटंचाईचे संकट
४पूर्णा तालुक्यातील नऊ गावांमधील वीजपुरवठा महावितरणच्या वतीने खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. यापूर्वी अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता; परंतु, काही गावांनी अपेक्षित बिलाची रक्कम जमा केल्याने त्या गावातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वीज वितरण कंपनीने खंडित केलेल्या नऊ गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
वीजपुरवठा खंडित केलेल्या गावातील ग्रामस्थांना किमान मागील एक वर्षाचे वीज बिल भरणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी थकित वीज बिल भरल्यास महावितरणकडून नऊ गावांचा खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
-सचिन कल्याणकर,
उपकार्यकारी अभियंता