Parabhani: येलदरी धरण तुडुंब भरले, सर्व दहा दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 12:43 IST2025-08-18T12:42:23+5:302025-08-18T12:43:00+5:30
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने येलदरी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक येत आहे.

Parabhani: येलदरी धरण तुडुंब भरले, सर्व दहा दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू
- प्रशांत मुळी
येलदरी वसाहत (परभणी): जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे तर दुसरीकडे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या दहा दरवाज्यातून सोमवारी सकाळी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारी दुपारी दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात होता यानंतर पाण्याची आवक धरणाच्या साठ्यात वाढल्यामुळे रात्री साडेनऊ वाजता चार दरवाज्यातून हा विसर्ग सुरू होता. त्यानंतर पुन्हा सोमवारी सकाळी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे सुद्धा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील विविध मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येलदरी धरण सोमवारी पहाटे 100 टक्क्यांवर पोहचले. त्यामुळे प्रशासनाने विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. धरणाचे सर्व दहा वक्रद्वारे सोमवारी सकाळी 7 वाजता अर्ध्या मीटरने, 9.30 वाजता 1 मीटरने तर दुपारी बारा वाजता गेट क्र.1,3,5,6,8 व 10 हे 1.5 मीटरने आणि गेट क्र. 2,3,4,7, व 9 हे 1 मीटरने चालू राहणार आहेत. यातून तब्बल 53 हजार 360 क्युसेक इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तर येलदरी वीज निर्मिती केंद्राच्या तीन विद्युत जनित्रातून 2700 कुसेक्स विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रात सुरू आहे. दरम्यान, नदी काठच्या गावांना जल संपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी, जनावरे व शेती उपयोगी साहित्य नदी पात्रापासून लांब काढून ठेवावे, असे आवाहन येलदरी धरण प्रशासनाने केले आहे.
मुसळधार पावसाने आवक वाढली
वाढती आवक लक्षात घेऊन आणि पूर नियंत्रणासाठी 15 ऑगस्ट रोजी येलदरी धरणातून येथील वीज निर्मिती केंद्राच्या दोन जनित्रातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत गेली. रविवारी धरणात 97 टक्के पाणीसाठा झाला. यामुळे जलविद्युत केंद्राचे तीन युनिट सोडल्यानंतर रविवारी सायंकाळी धरणाचे सुरवातीला दोन तर रात्री चार दरवाजे उघडले होते. मात्र पांडूक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने प्रशासनाने धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात विसर्ग करण्याचा निर्णय घेतला.
येलदरी धरणाच्या दहा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा #parabhani#raining#marathwadapic.twitter.com/kSGnhu9sgY
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 18, 2025
पूर्णा प्रकल्पाचे तीनही धरणे तुडूंब
मराठवाड्यात पूर्णा नदीवर तीन धरणे बांधण्यात आलेली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण, परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण ही तीनही धरणे यंदा दमदार पावसाने शंभर टक्के भरली आहेत. या तीनही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आलेला आहे.
विदर्भ-मराठवाडा रस्ता बंद होण्याची शक्यता
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने येलदरी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक येत आहे. यामुळे धरणातून होणारा विसर्ग वाढविण्यात येण्याची माहिती आहे. विसर्ग वाढला तर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या येलदरी धरणाजवळील पुलावरून पाणी जाऊन रस्ता बंद होण्याची शक्यता आहे.