Parabhani: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलांना चारचाकीने उडवले, दोघींचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:46 IST2025-08-07T12:46:19+5:302025-08-07T12:46:58+5:30
परभणी जि.प.च्या माजी अध्यक्षांच्या पत्नी अपघातात ठार...

Parabhani: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलांना चारचाकीने उडवले, दोघींचा जागीच मृत्यू
- लक्ष्मण कच्छवे
दैठणा (जि.परभणी) : परभणी तालुक्यातील दैठणा येथून गेलेल्या परभणी-गंगाखेड महामार्गावर अज्ञात वाहनाने सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना चारचाकी वाहनाने उडवले. यात दोन्ही महिला जागीच ठार झाल्याची गंभीर घटना घडली. यामध्ये जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उत्तमराव कच्छवे यांच्या पत्नी अपघातात ठार झाल्या आहेत. कच्छवे दाम्पत्य नेहमीप्रमाणे दररोजच्या मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांच्या कुटूंबावर गुरुवारची पहाट ही वेदनादायी ठरली आहे. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दैठणा येथील रहिवासी तथा परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उत्तमराव कच्छवे हे गुरुवारी पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी मॉर्निंग वॉकसाठी परभणी-गंगाखेड रस्त्याने पत्नीसह जात होते. ते दैठणा येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत गावातील एक महिलाही होती. दरम्यान, पाच वाजून २५ मिनिटांनी दैठणा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर माळसोन्ना फाटा येथे ते पोहचले होते. त्यावेळी उत्तमराव हे थोडे पुढे गेले होते तर दोन्ही महिला पाठीमागेच होत्या. थोडासा अंधार असल्यामुळे रस्त्याच्या कडेने चालताना अचानकपणे अतिवेगात आलेल्या एका चारचाकीने या दोन्ही महिलांना पाठीमागून धडक दिली. हे वाहन पुढे परभणीकडे गेले.
या आवाजाने उत्तमराव पाठीमागे घेऊन पाहतात तर त्यांच्या पत्नी पुष्पाबाई कच्छवे (६९) या रस्त्याच्या खाली पडलेल्या दिसल्या तर त्यांच्यासोबत असलेल्या अंजनाबाई सुरेश शिसोदे (५५) या रोडच्या मध्ये गतप्राण अवस्थेमध्ये पडलेल्या दिसल्या. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या युवकांनी ग्रामस्थांना बोलावून घेतले. यावेळी बाळासाहेब कच्छवे, रामकिशन कच्छवे, मारोतराव कच्छवे यांनी ही अपघाताची माहिती दैठणा पोलीस ठाण्यात कळवली. यावेळी सपोनि.अशोक जायभाये, उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. या प्रकरणी अज्ञात चारचाकी वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, परभणी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष उत्तमराव कच्छवे हे पत्नीसोबत मागील पाच वर्षांपासून मॉर्निंग वॉकसाठी या रस्त्याने जात होते. आजच्या घटनेत त्यांच्या पत्नीच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत पुष्पाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगी, चार मुले, नातू, पणतू असा परिवार आहे. तर मयत अंजनाबाई सुरेश शिसोदे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, नातू असा परिवार आहे.
अपघातांतर वाहन चालकाने काढला पळ
घटनास्थळी न थांबता कुठलीही मदत न करता वाहन चालकाने पळ काढला होता. परभणी-गंगाखेड रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांसोबत अनेक वेळा अपघात झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी न जाता इतर रस्त्यावर जावे, या रस्त्यावरील पथदिवे ही मागील अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे येथे अंधाराचे साम्राज्य असून यामुळे ही अपघाताचे प्रमाण वाढले आहे.