Parabhani: विवाहानंतर पुण्याला जाताना चहासाठी गाडी थांबली; क्षणात नवरी दागिन्यांसह पळाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:00 IST2025-12-05T16:59:43+5:302025-12-05T17:00:02+5:30
विवाह-जुळवणीच्या नावाखाली अशा प्रकारची अचूक योजना आखून फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे.

Parabhani: विवाहानंतर पुण्याला जाताना चहासाठी गाडी थांबली; क्षणात नवरी दागिन्यांसह पळाली
पालम : शहरात विवाह जुळवणीच्या नावाखाली रचलेल्या मोठ्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुण्यातील एका कुटुंबाची ३ लाख २५ हजारांची आर्थिक फसवणूक करून बनावट नवरी दागिन्यांसह फरार झाल्याची घटना ३ डिसेंबर रोजी समोर येताच शहरात एकच खळबळ उडाली आहे. विवाह-जुळवणीच्या नावाखाली अशा प्रकारची अचूक योजना आखून फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे.
पुणे येथील किरण रोहिदास मोरे व त्यांचे नातेवाईक पालम शहरात मुलगी पाहण्यासाठी आले होते. याचदरम्यान त्यांचा संपर्क विनायक जाधव, रेखा सूर्यवंशी, रंजना मोरे, नवनाथ बंडगिरे, प्रवीण कानेगावकर, तसेच मीना काकडे व माने नावाच्या महिलांशी आला. या एजंट मंडळींनी आधीच सरला मधुकर कोलते (रा. धनगर टाकळी) या नावाने बनावट आधार कार्डासह बनावट नवरी तयार ठेवली होती. मोरे कुटुंबाला मुलगी दाखवण्यात आली. मुलगी पसंत झाल्यानंतर एजंटांनी विवाहाची तयारी चालू असल्याचे सांगून २ लाख ९० हजार रोख व ३५ हजार किमतीचे मंगळसूत्र आणि जोडवे दागिने घेतले. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी केरवाडी शिवारातील हनुमान मंदिरात लग्न लावून दिले.
सर्व काही सुरळीत असल्याचा भास निर्माण करून नवरा–नवरीला पुण्याकडे रवाना करण्यात आले. मात्र, खरा घात यानंतरच झाला. किरण मोरे नववधूसह प्रवासाला निघाले असताना त्यांच्या मागे दुसरी गाडी संशयास्पद हालचाली करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अंबाजोगाई येथे चहासाठी गाडी थांबवल्यानंतर बनावट नवरी क्षणात दागिन्यांसह फरार झाली. या प्रकाराने मोरे कुटुंब हादरले असून, त्यांनी तातडीने पालम पोलिस ठाण्यात धाव घेतली. सपोनि. एस.के. खटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली असून, दोन महिला एजंटांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत पालम पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता; परंतु या घटनेत जवळपास ११ आरोपींचा सहभाग असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.