Parabhani: धडकेत ट्रक चालकाचा अंत,गाडीचा चुराडा! मध्यरात्री जेसीबीने वाहतूक सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 11:57 IST2025-12-13T11:56:40+5:302025-12-13T11:57:22+5:30
धडक इतकी भीषण की चुराडा झाला! पाथरी–पोखरणी रस्त्यावर उसाचा ट्रक-ट्रेलरची समोरासमोर टक्कर

Parabhani: धडकेत ट्रक चालकाचा अंत,गाडीचा चुराडा! मध्यरात्री जेसीबीने वाहतूक सुरळीत
पाथरी (परभणी): पाथरी–पोखरणी रस्त्यावर रेणापूर गावाजवळ शुक्रवारी (दि. १२) रात्री साडेदहाच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात झाला. उसाची रिकामी अशोक लेलँड ट्रक आणि ट्रेलर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे ट्रक चालकाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला.
रिकामी ट्रक घेऊन येत असताना काळ आला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक लेलँड कंपनीची ट्रक (MH 26 –A D 3537) उसाची रिकामी खेप घेऊन पाथरीकडे येत होती. बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी असलेले समीर सय्यद हे ट्रक चालवत होते. दरम्यान, पाथरीकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रेलर टेम्पोने (MH 44, 5757) समोरून ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, ट्रक चालक समीर सय्यद यांचा घटनास्थळीच दुर्दैवी अंत झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध आडवी झाल्याने पाथरी–पोखरणी मार्गावरची वाहतूक पूर्णपणे खोळंबली.
पेट्रोलिंगवरील अधिकाऱ्याची तत्परता
पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांना पेट्रोलिंग करत असताना या भीषण अपघाताची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळी धाव घेतली. निरीक्षक केंद्रे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल एस एन लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल समीर शेख यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने दाखल झाले.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी जेसीबीचा वापर
रस्त्यावर वाहनांचा मोठा खोळंबा झाल्याने आणि अपघातग्रस्त वाहनांचा ढीग हटवण्यासाठी पोलिसांना जेसीबी यंत्राची मदत घ्यावी लागली. जेसीबीच्या साहाय्याने वाहने रस्त्याच्या कडेला हटवल्यानंतर मध्यरात्री उशिरा वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची नोंद पाथरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.