पाऊस थांबता थांबेना, आवक वाढल्याने येलदरी धरणातून पूर्णा नदीत ११ हजार क्युसेक्स विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:27 IST2025-10-30T17:25:48+5:302025-10-30T17:27:02+5:30
येलदरी धरण १५ ऑगस्ट २०२५ रोजीच पूर्ण क्षमतेने भरले होते आणि तेव्हापासून सुरू असलेले पूर नियंत्रण आजही सुरूच आहे.

पाऊस थांबता थांबेना, आवक वाढल्याने येलदरी धरणातून पूर्णा नदीत ११ हजार क्युसेक्स विसर्ग
येलदरी वसाहत (परभणी): यावर्षीच्या पावसाळ्याने पाठ सोडली नसल्यामुळे परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाची आवक दररोज वाढतच आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग नियंत्रित करताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली आहे. धरणातून गुरुवारी दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला होता, आता आज (३० ऑक्टोबर) पुन्हा दोन दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे.
येलदरी धरण १५ ऑगस्ट २०२५ रोजीच पूर्ण क्षमतेने भरले होते आणि तेव्हापासून सुरू असलेले पूर नियंत्रण आजही सुरूच आहे. धरणातील पाण्याची आवक कमी होत नसल्यामुळे जलविद्युत निर्मिती केंद्राचे तीनही संच १५ ऑगस्टपासून सलग सुरू आहेत. या केंद्रातून २७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत सोडला जात आहे. गुरुवारी (२७ ऑक्टोबर) धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडून ४२२० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. तरीही आवक वाढतच असल्याने आज (३० ऑक्टोबर) दुपारी चार वाजता धरणाचे अजून दोन दरवाजे उघडावे लागले.
सद्यस्थितीत ११ हजार क्युसेक्स विसर्ग
सध्या धरणाच्या १० पैकी चार दरवाज्यांमधून, तसेच जलविद्युत केंद्राच्या तीन संचांमधून मिळून पूर्णा नदीत एकूण ११ हजार १४० क्युसेक्स एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. आवक वाढत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करत विद्युत निर्मिती केंद्राचे तीनही युनिट पुन्हा सुरू केले आहेत. जलसंपदा विभागाने पूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
वीज निर्मितीचा दिलासा
एकीकडे पूर नियंत्रणाचा ताण असला तरी, धरणात येणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे १५ ऑगस्ट २०२५ पासून दररोज २२.५० मेगावॉट एवढी वीज निर्मिती सुरू आहे. यामुळे स्थानिक स्तरावर काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.