Parabhani: फेसबुकवर शासनाची बदनामी करणारी पोस्ट करणारा शिक्षक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 20:16 IST2025-10-15T20:14:57+5:302025-10-15T20:16:05+5:30
मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील ज्ञानोपासक विद्यालयातील सहशिक्षकावर कारवाई

Parabhani: फेसबुकवर शासनाची बदनामी करणारी पोस्ट करणारा शिक्षक निलंबित
परभणी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेबाबत समाजमाध्यमांवर अर्धवट व दिशाभूल करणारा मजकूर पोस्ट केल्यामुळे शासनाची प्रतिमा मलीन झाल्याचे कारण देत मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील ज्ञानोपासक विद्यालयातील सहशिक्षक देवीदास शिंपले यांना १० ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, देवीदास शिंपले यांनी ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर “राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारामागचे गौडबंगाल बाहेर आणणार” या शीर्षकाखाली पोस्ट करत राज्य शिक्षक पुरस्कार २०२४ च्या प्रक्रियेवर कोणतेही ठोस पुरावे न देता आक्षेप नोंदविले होते. याशिवाय, त्यांनी शासनाच्या धोरणावर टीकात्मक भाष्य केले होते. पुढे ४ सप्टेंबर रोजी त्यांनी ती पोस्ट हटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी १० ऑक्टोबर रोजी शिंपले यांचे निलंबन आदेश काढले. आदेशात नमूद करण्यात आले आहे की, त्यांच्या कृतीमुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची तसेच शासनाची प्रतिमा मलीन झाली आहे.
उपस्थित प्रश्नांची चौकशी होणार का?
मात्र, देवीदास शिंपले यांनी त्यांच्या पोस्टमधून संस्थेतील काही अनियमिततेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची चौकशी शिक्षण विभाग करणार का, हा प्रश्न आता परभणीकरांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षकाची निलंबन कारवाई करताना त्यांच्या आरोपांची पडताळणी होणार का? की निलंबनावरच प्रकरण थांबविले जाणार, असा प्रश्न नागरिक व शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून विचारला जात आहे.