परभणीत भाजप-शिंदेसेनेची युती जागावाटपात तुटली; भाजपने धोका दिल्याचा शिंदेसेनेच्या नेत्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:45 IST2025-12-30T14:44:52+5:302025-12-30T14:45:25+5:30
या दोन पक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. मात्र त्या चर्चेतील जागा वाटपाचा फॉर्म्युला कधीच बाहेर आला नाही.

परभणीत भाजप-शिंदेसेनेची युती जागावाटपात तुटली; भाजपने धोका दिल्याचा शिंदेसेनेच्या नेत्यांचा आरोप
परभणी : महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष व शिंदेसेनेची युती जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र जागा वाटपाचे सूत्र शेवटपर्यंत जुळले नाही. शेवटी युती तुटल्याचे दोन्हीकडूनही जाहीर करण्यात आले आहे.
या दोन पक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. मात्र त्या चर्चेतील जागा वाटपाचा फॉर्म्युला कधीच बाहेर आला नाही. शिंदेसेनेला दिलेल्या जागांवरही भाजपच उमेदवार देवू पाहात असल्याने युतीत मिठाचा खडा पडण्याची चिन्हे आधीपासूनच व्यक्त होत होती. काही ठिकाणी शिंदेसेनेकडे तगडे उमेदवार असले तरीही ते भाजपला नको होते. तर भाजपच्या काही उमेदवारांना शिंदेसेनेचा विरोध होता. हिंदुबहुल प्रभागांतील जागांवर आधी वाद होता. त्याचा फॉर्म्युला ठरला तरीही युती फिस्कटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजपने धोका दिला
भाजपने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत ठरविलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला पाळला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला मंजुरी दिली होती. मात्र हिंदुबहुल भागात १३ जागा दिल्या जात नव्हत्या. जेथे दोघांचेही बळ अपुरे आहे, अशा ठिकाणी अर्ध्या अर्ध्या जागा लढायच्या होत्या. त्यातही अडचणी आणल्या गेल्या. यामुळे शेवटी आम्ही ३५ जणांना ए.बी. फॉर्म दिले असून शेवटच्या टप्प्यात आणखी काही उमेदवार मिळतात का? याची चाचपणी सुरू आहे. -आनंद भरोसे, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना
भाजप जास्तीत जास्त उमेदवार देणार
शिंदेसेनेसोबत शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपाची बोलणी सुरू ठेवली. त्यात ज्या जागांवर मतभेद होते. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शिंदेसेनेकडून त्याला प्रतिसाद दिला जात नव्हता. नाईलाजाने युती तुटली. भाजपकडून जास्तीत जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न राहील. -शिवाजी भरोसे, महानगराध्यक्ष, भाजप
अजूनही युती टिकविण्याचे प्रयत्न
भाजप व शिंदेसेनेचा जो युतीचा फॉर्म्युला ठरला. तो पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यासाठी अनेकदा चर्चा झाली. मात्र अमका उमेदवार नको, तमकाच उमेदवार द्या अशी भूमिका शिंदेसेनेने घेतली. निवडणूक केवळ लढणेच हा उद्देश नसून ती जिंकलीही पाहिजे. भाजप शहरात जेवढा प्रबळ पक्ष आहे, ते पाहता त्यांनी काही बाबी समजून घेणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. अजूनही माघारीपर्यंत युतीचे काही गणित बसविता येईल का, ते पाहू. -सुरेश वरपूडकर, माजी आमदार, भाजप