Parabhani: ४ लाख देऊन लग्न केलं, पण 'करमत नाही' म्हणत नवविवाहिता दागिने घेऊन पळाली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:56 IST2025-09-12T13:55:09+5:302025-09-12T13:56:21+5:30
लग्नानंतर विवाहिता पसार, तरुणाची फसवणूक; मानवत पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा

Parabhani: ४ लाख देऊन लग्न केलं, पण 'करमत नाही' म्हणत नवविवाहिता दागिने घेऊन पळाली!
मानवत : लग्न झाल्यानंतर मला येथे करमत नाही, असे म्हणून अंगावरील सोने घेऊन गेलेली विवाहिता परत आलीच नाही. चौकशी केल्यावर सदर तरुणीचे यापूर्वीदेखील लग्न ठरले होते, असे समजले. विश्वासघात, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी १० सप्टेंबरला तरुणाच्या तक्रारीवरून विवाहितेसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मानवत तालुक्यातील वझूर बु. येथील २७ वर्षीय तरुण अक्षय रंजित चव्हाण याने याबाबत तक्रार दिली. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे तरुणाच्या वडिलांनी ४ लाख मुलीच्या वडिलांना दिले. मुलीच्या अंगावर दोन तोळे सोने घालून बुलढाणा जिल्ह्यातील एका मुलीसोबत मध्यस्थामार्फत मे २०२५ मध्ये लग्न लावले. लग्नानंतर नवविवाहिता काही दिवस मुलाकडे राहिली. त्यानंतर मला येथे करमत नाही, असे म्हणत अंगावरील सोने घेऊन विवाहिता निघून गेली. ती परत आलीच नाही.
मुलीचे आधीही लग्न झालेले
पीडित तरुण व त्याच्या नातेवाइकांनी याबाबत बुलढाणा जिल्ह्यात जाऊन चौकशी करून मुलीच्या वडिलांना दिलेले ४ लाख, दागिने परत मागितले. मात्र, त्यांनी ते देण्यास नकार दिला. मुलीचे यापूर्वी पण लग्न ठरलेल्या पत्रिका तरुणाला दिसून आल्या. संबंधितांनी पीडित तरुणाप्रमाणेच इतरांनाही फसविले असावे, अशी शक्यता आहे. याप्रकरणी साक्षी सुरुशे, सीमा सुरुशे, राजू सुरुशे, नूतन खंदारे यांच्यावर मानवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोउपनि. घोरपडे करीत आहेत.