Parabhani: गॅस टाकीसाठी पत्नीसमोरच कुऱ्हाडीने वार करत पतीचा खून, आरोपीस जन्मठेप!
By राजन मगरुळकर | Updated: October 8, 2025 19:44 IST2025-10-08T19:41:54+5:302025-10-08T19:44:02+5:30
'गॅस टाकी'च्या रागातून केलेला खून! या घटनेने परभणी हादरले होते. आज मिळाला न्याय

Parabhani: गॅस टाकीसाठी पत्नीसमोरच कुऱ्हाडीने वार करत पतीचा खून, आरोपीस जन्मठेप!
परभणी : गॅसची टाकी परत दे, असे म्हटले असता राग आल्याने आरोपीने फिर्यादीच्या पतीचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना कोतवाली ठाण्याच्या हद्दीत सन २०२२ च्या जून महिन्यात घडली होती. या प्रकरणात बुधवारी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी प्रत्यक्ष साक्षीदार, वैद्यकीय पुरावा व युक्तिवादाच्या आधारे आरोपीस खून प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
जावेद खान गफार खान (रा. क्रांतीनगर) या आरोपीस आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात परविन बेगम शेख जावेद (रा. क्रांतीनगर) यांनी १८ जून २०२२ ला कोतवाली ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी जावेद खान गफार खान याची फिर्यादीचा पती शेख जावेद शेख युसूफ याच्याशी ओळख होती. आरोपी हा अवैध गॅसची विक्री करतो. त्या अनुषंगाने घटनेच्या १५ दिवसांपूर्वी आरोपी हा फिर्यादीची गॅस टाकी घेऊन गेला होता. फिर्यादीचा पती शेख जावेद शेख युसुफ हा जावेद खान गफार खान याच्याकडे गॅस टाकी परत दे, म्हणून १७ जूनला रात्री आठ वाजता गेला होता. त्याच्या पाठीमागे फिर्यादी गेल्या होत्या. गॅसची टाकी परत दे असे म्हटले असता जावेद खान गफार खान याने रागाच्या भरात शिवीगाळ केली व हातातील कुऱ्हाडीने फिर्यादीसमोर शेख जावेद याच्या गळ्यावर व डोक्यात वार केले. त्यामुळे मयताच्या डोक्यातून रक्त निघाले. कुऱ्हाड नालीत टाकून आरोपीने पळ काढला.
सरकारी दवाखान्यात फिर्यादीच्या पतीस नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यावरून आरोपीविरुद्ध कलम ३०२, ५०४ भादंविप्रमाणे तपासी अधिकारी शरद जऱ्हाड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरील प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यू.एम. नंदेश्वर यांच्या समक्ष चालविण्यात आले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील डी. यू. दराडे यांनी आठ साक्षीदार तपासले. या प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदार, वैद्यकीय पुरावा, घटनास्थळावरून कुऱ्हाडीची जप्ती हा पुरावा व युक्तिवाद महत्त्वाचा ठरला. न्यायालयाने आरोपी जावेद खान गफार खान यास आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाठी शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी सुरेश चव्हाण, भागोजी कुंडगीर, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.