Parabhani: पुराच्या पाण्यात घरसंसार वाहून गेला; मदतीच्या प्रतीक्षेतील शेतमजूराने जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:09 IST2025-10-13T17:06:07+5:302025-10-13T17:09:19+5:30
पुरग्रस्त शेतमजुराने शासनाच्या निष्क्रियतेने टोकाचा निर्णय घेतल्याचा ग्रामस्थांचा संताप

Parabhani: पुराच्या पाण्यात घरसंसार वाहून गेला; मदतीच्या प्रतीक्षेतील शेतमजूराने जीवन संपवले
- विठ्ठल भिसे
पाथरी ( परभणी) : अतिवृष्टी आणि गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे पाथरी तालुक्यातील गोदा काठच्या जवळपास 21 गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, गोदाकाठच्या पूरग्रस्त रामपुरी रत्नेश्वर येथे रविवारी सायंकाळी एका शेतमजूराने पुराच्या पाण्याने सारे वाहून गेले, शासनाची मदतही मिळेना, या व्यथेत जीवन संपवले.
रामपुरी बुद्रुक येथील वयोवृद्ध शेतमजूर धोंडीराम चंद्रभान जगताप (वय ६५) यांनी रविवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात पाणी घुसले...शासनाची मदत मिळत नाही...अशी व्यथा ते व्यक्त करत होते. त्यानंतर त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली. महापुराच्या पाण्याने जगताप यांचे घर व संसार दोन्ही उद्ध्वस्त झाले होते. दैनंदिन मजुरीवर जगणाऱ्या या शेतमजुराला सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. प्रशासन म्हणते दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ दिले बाधित कुटुंबाला एवढी मदत पुरेशी आहे का, असा प्रश्न या घटनेतून उपस्थित होऊ लागला आहे. शेवटी मदतीच्या प्रतीक्षेत असताना त्यांनी जीवन संपवल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला.दरम्यान मायतावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले , मुलगा रामेश्वर जगताप यांच्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणी अधिक तपास पोहे एस एन लोखंडे हे करीत आहेत
घरात पाणी घुसले, मदत कधी मिळणार?
गोदावरीला आलेल्या महापुरामुळे गोदाकाठ परिसरातील तब्बल २१ गावे बाधित झाली आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, संसार उघडे पडले. मात्र, शासनाकडून अद्याप पुरेशी मदत पोहोचली नाही. रामपुरीसारख्या गावांत नागरिक अजूनही विस्थापित अवस्थेत आहेत. गोदाकाठ गावामध्ये काही वसाहतीत पाणी शिरले महसुली यंत्रणेने यासाठी दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू लाभार्थ्यापर्यंत स्वस्त धान्य दुकानदार मार्फत पोहोच केले. मात्र तेवढी मदत पुरेशी होती का या घटनेवरून दिसून येत आहे.