Parabhani: सिलिंडर लिकेजमुळे स्वयंपाकघरात आगीचे लोट, अग्निशमन जवानांमुळे अनर्थ टळला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:12 IST2025-12-06T16:10:36+5:302025-12-06T16:12:13+5:30
जीवाची बाजी लावून आग विझवणाऱ्या जवानांचे नागरिकांकडून कौतुक; कुटुंबाचा जीव वाचला

Parabhani: सिलिंडर लिकेजमुळे स्वयंपाकघरात आगीचे लोट, अग्निशमन जवानांमुळे अनर्थ टळला!
- विठ्ठल भिसे
पाथरी (परभणी): पाथरी शहरात गुरुवारी (दि. ६ डिसेंबर) दुपारी १२.४२ वाजता पाटील गल्ली परिसरात गॅस सिलिंडर लिकेजमुळे लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहरात खळबळ उडाली. निखिल पाटील यांच्या घरी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस बाहेर पडू लागला आणि क्षणार्धात संपूर्ण स्वयंपाकघर आगीच्या ज्वालांनी वेढले. मात्र, अग्निशमन दलाच्या दोन जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता केलेल्या धाडसी कामगिरीमुळे मोठी जीवितहानी टळली.
स्वयंपाकघरात आग आणि धुराचे लोट
दुपारच्या वेळी स्वयंपाकाचे काम सुरू असताना निखिल पाटील यांच्या घरी हा प्रकार घडला. अचानक गॅस लिकेज होऊन आग इतकी भडकली की काही क्षणांतच स्वयंपाकघर धूर आणि आगीच्या लोटांनी भरून गेले. सिलिंडरमधील लिकेजमुळे आग स्फोटक स्वरूपात भडकली. यामुळे घरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली होती.
बुलेट गाडीवर धावले, जीवाची पर्वा केली नाही!
घटनेची माहिती मिळताच, पाथरी अग्निशामक दलाचे जवान खुर्रम खान आणि बळीराम गवळे यांनी तत्काळ अग्निशमन बुलेट गाडीवरून घटनास्थळी धाव घेतली. आग इतकी भीषण होती की ती क्षणात संपूर्ण घराला आपल्या विळख्यात घेऊ शकली असती. मात्र, खुर्रम खान आणि बळीराम गवळे यांनी जराही विलंब न लावता, आपल्या जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली.
मोठी दुर्घटना टळली
त्यांच्या वेळेवर आणि धाडसी हस्तक्षेपामुळे कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित राहिले. या भीषण आगीत घरातील वस्तू आणि साहित्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. खुर्रम खान आणि बळीराम गवळे यांच्या या धाडसी कार्याचे शहरातून नागरिक, स्थानिक प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.