कष्ट शेतकऱ्याचे, कमिशन अधिकाऱ्याला; बिलासाठी लाच घेणारा वनपाल एसीबीच्या ताब्यात
By राजन मगरुळकर | Updated: December 17, 2025 11:33 IST2025-12-17T11:31:21+5:302025-12-17T11:33:28+5:30
बांबू लागवडीच्या पैशांसाठी वनपालाने लावला होता तगादा; पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर 'एसीबी'ची धडक कारवाई

कष्ट शेतकऱ्याचे, कमिशन अधिकाऱ्याला; बिलासाठी लाच घेणारा वनपाल एसीबीच्या ताब्यात
परभणी : तक्रारदार यांच्या शेतातील बांबू लागवडीचे कुशल कामाच्या बिलावर सही करून वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी वनपालने एकूण बिलाच्या १५ टक्के प्रमाणे पैशाची मागणी केली. यावर पैसे कमी करण्याची विनंती केली असता वनपालने दहा हजारांची मागणी करून त्यातील दोन हजार रुपये घेतले. याच प्रकरणात तक्रारदाराने मंगळवारी एसीबी पथकाकडे तक्रार दिली. त्यावरून केलेल्या सापळा कारवाईत वनपाल तथा अतिरिक्त कार्यभार वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल फड यांनी पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.
अमोल गणेशराव फड, वनपाल, सामाजिक वनिकरण सेलू, अतिरिक्त कार्यभार वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनिकरण ता. सेलु असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. यामध्ये दोन हजार रुपये रक्कम स्वीकारल्यानंतर उर्वरित आठ हजार रुपयांपैकी पाच हजार रुपये आत्ताच आणून द्या असे म्हणून लाच मागणी केल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले. पडताळणी व सापळा कार्यवाही दरम्यान ५ हजार स्वीकारले.
या प्रकरणी आरोपी लोकसेवकास एसीबीच्या पथकाने कारवाई करून ताब्यात घेतले. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्यासह चंद्रशेखर निलपत्रेवार, आदमे, अतुल कदम, शेख जिब्राईल, अनिल नरवाडे यांनी केली.