Parabhani: 'माळसोन्ना शाळेत शिक्षकं द्या'; ग्रामस्थांनी थेट शिक्षण विभागात भरवली शाळा
By मारोती जुंबडे | Updated: July 22, 2025 15:53 IST2025-07-22T15:51:55+5:302025-07-22T15:53:28+5:30
माळसोन्ना शाळेत एकूण पाच शिक्षक पदे मंजूर असून सध्या फक्त दोन शिक्षक कार्यरत आहेत.

Parabhani: 'माळसोन्ना शाळेत शिक्षकं द्या'; ग्रामस्थांनी थेट शिक्षण विभागात भरवली शाळा
परभणी: तालुक्यातील माळसोन्ना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ आणि शालेय समितीने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात थेट विद्यार्थ्यांची शाळा भरवून अनोखे आंदोलन केले.
माळसोन्ना शाळेत एकूण पाच शिक्षक पदे मंजूर असून सध्या फक्त दोन शिक्षक कार्यरत आहेत. इतर तीन पदे मागील काही महिन्यांपासून रिक्त आहेत. शाळेत १ ते ७ वीपर्यंतचे वर्ग चालतात आणि ११३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षक संख्या अपुरी असल्याने दर्जेदार शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयात मुलांसह पालकांनी हजेरी लावली. मुलांनी वही-पुस्तकांसह थेट जिल्हा परिषद कार्यालयात अभ्यास सुरू केला. शाळेत शिक्षक नाहीत म्हणून आम्ही इथे आलो आहोत, शिक्षक नसेल तर आम्हाला इथेच शिकवा, असा रोष व्यक्त करत ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात ज्योती लाड, भगवान लाड, माणिकराव लाड, छत्रगुण लाड, पुष्पा लाड, गणेश चव्हाण, प्रल्हाद लाड, बाळासाहेब पुर्णे, शंकर जाधव, संजय लाड, धोंडीराम लाड, विलास साळवे, विकास लाड यांच्यासह २३ ग्रामस्थ विद्यार्थ्यांसोबत सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने शिक्षकांची भरती करावी, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला गेला. शिक्षण विभागाने याची दखल घेत कार्यवाहीचे आश्वासन दिले.