Parabhani: नियंत्रण सुटून भरधाव 'ट्रिपल सीट' दुचाकी थेट नालीत कोसळली, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 16:29 IST2025-12-13T16:27:17+5:302025-12-13T16:29:24+5:30
भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि शासकीय विश्रामगृह समोर त्यांची दुचाकी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या नालीत कोसळली.

Parabhani: नियंत्रण सुटून भरधाव 'ट्रिपल सीट' दुचाकी थेट नालीत कोसळली, एकाचा मृत्यू
सेलू (परभणी): सेलू शहरात शुक्रवारी रात्री भरधाव वेगातील दुचाकी अपघातामुळे एका १७ वर्षीय युवकाला आपला जीव गमवावा लागला. शासकीय विश्रामगृह समोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या नालीत दुचाकी कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. यात तीन युवक गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सेलू शहरातील सर्वोदय नगर येथील रहिवासी असलेले प्रेम अनिल धापसे (वय १७), विजय अंभोरे (वय २१) आणि आशिष तोडे (वय २२) हे तिघे युवक रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास एकाच दुचाकीवरून (एम. एच. ४३ बि. एम. ४८५६) बसस्थानक रस्त्यावरून येत होते. भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि शासकीय विश्रामगृह समोर त्यांची दुचाकी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या नालीत कोसळली. अपघातानंतर तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. संदीप झुंबड यांनी प्रथमोपचार दिल्यानंतर तिघांनाही परभणीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान, प्रेम अनिल धापसे याची प्राणज्योत मालवली.
भरधाव वेग ठरला काळ
अपघात नेमका कसा घडला, याचा अधिकृत तपशील कळू शकला नाही, मात्र भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शासकीय रुग्णालय परभणी येथे शवविच्छेदनानंतर प्रेमचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे सर्वोदय नगर भागात शोककळा पसरली असून, एका तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.