घर मालक अपघातात जखमी मुलास भेटण्यास गेले, इकडे चोरट्यांनी घरफोडी केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 17:56 IST2021-10-25T17:56:26+5:302021-10-25T17:56:40+5:30
इमारतीमधील तिन्ही भाडेकरूंच्या घरांना बाहेरून कडी लावली

घर मालक अपघातात जखमी मुलास भेटण्यास गेले, इकडे चोरट्यांनी घरफोडी केली
सेलू : खिडकीची लोखंडी जाळी काढून घरात प्रवेश करत चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम असा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना आज पहाटे शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथे घडली.
स्वामी विवेकानंद नगरातील रहिवासी पुंजाराम धोडिंबा शेवाळे हे रविवारी अपघातात जखमी झालेल्या मोठ्या मुलाला भेटण्यासाठी औरंगाबाद येथे गेले होते. त्यामुळे त्यांच्या घरी केवळ पत्नी व नातवंडे होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी आज पहाटे शेवाळे यांच्या दोन मजली इमारतीमधील तीन भाडेकरूंच्या घरांच्या बाहेरून कड्या लावल्या. त्यानंतर शेवाळे यांच्या बेडरूमच्या खिडकिची लोखंडी जाळी काढत आत प्रवेश केला.
चोरट्यांनी आतील दोन लोखंडी कपाटे उघडून सोन्याची,चांदीची दागिने आणि तीन हजार रोख असा १ लाख ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भारती पुंजाराम शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.