'अडचणीवर मात केली आणि सेंद्रिय शेतीच केली'; बाबासाहेब रणेर यांना कृषीभूषण पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 19:24 IST2021-04-01T19:23:01+5:302021-04-01T19:24:41+5:30
महाराष्ट्र शासनाकडून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

'अडचणीवर मात केली आणि सेंद्रिय शेतीच केली'; बाबासाहेब रणेर यांना कृषीभूषण पुरस्कार जाहीर
पाथरी : तालुक्यातील बाभळगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब तात्यासाहेब रणेर यांना महाराष्ट्र शासनाचा 2018 चा कृषीभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने बुधवारी याची माहिती दिली. राज्यात कृषी कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामध्ये पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या बाबासाहेब तात्याराव रणेर यांना २०१८ साठी सेंद्रियशेती गटात कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे .बाबासाहेब रणेर यांना बाभळगाव शिवारामध्ये एक हेक्टर जमीन आहे. यामध्ये ते ऊस , सोयाबीन पिके सेंद्रिय पद्धतीने घेत असतात. रणेर यांनी २०११ - १२ मध्ये भरतेश्वर शेतकरी गटाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी काकडी ,मिरची व सघन पद्धतीने कापूस लागवड इत्यादी प्रयोग केले. यातून गटातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. या कार्यासाठी २०१३ - १४ चा प्रकल्प आत्माकडून दिला जाणारा उत्कृष्ट गटाचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
यानंतर त्यांनी २० शेतकऱ्यांना घेत झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबीर याद्वारे सेंद्रिय शेतीसाठीचे प्रशिक्षण घेतले. पुढे चालून या सर्वांनी मिळून सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी गोवर्धन सेंद्रिय गटाची स्थापना केली आहे. गटामुळे त्यांना एकत्रित प्रशिक्षण व अभ्यास दौरे यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा व तंत्रज्ञान शिकण्यासाठी मदत झाली. त्यांनी स्वतः गटातील शेतकऱ्यांना गांडूळ युनिट उभारणीसाठी पुढाकार घेत मदत केली. जीवामृत ,बीजामृत व दशपर्णी अर्क इत्यादी सेंद्रिय शेती साठी आवश्यक बाबींचा ते स्वतःच्या शेतीमध्ये वापर करत असतात. यातून अडीच एकर क्षेत्रात कमी गुंतवणुकीतून आधीचा नफा त्यांना मिळाला लागला आहे. हीच गोष्ट त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या शेतावर राबवल्याने त्यांच्याही उत्पादनात आता वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सुरुवातीला बाबासाहेब रणेर यांच्यासह गटातील शेतकऱ्यांना उत्पादन घेण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. यावर मात करत त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा मार्ग अवलंबला यातून जमिनीचे आरोग्य सुधारले, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले तसेच जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली असल्याचा अनुभव यावेळी बोलताना सांगितला. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा सेंद्रीय शेती क्षेत्रात दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला असून याबद्दल तालुक्यातील शेतकरी , गटशेतीतील शेतकरी सदस्य व कृषी विभागातील अधिकारी तसेच प्रकल्प आत्माच्या वतीने अभिनंदन होत आहे .