परभणीत रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:00 IST2018-10-08T23:59:30+5:302018-10-09T00:00:31+5:30
रेल्वेखाली कटून एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास परभणी रेल्वेस्थानकावर घडली़

परभणीत रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रेल्वेखाली कटून एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास परभणीरेल्वेस्थानकावर घडली़
परभणी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर नांदेड-मुंबई ही नंदीग्राम एक्सप्रेस सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास दाखल झाली़ ही गाडी परभणी स्थानक सोडून पुढे निघाल्यानंतर एका युवकाचा मृतदेह रेल्वे रुळावर पडला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली़ त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म़ शफियोद्दीन ए़ शेख, पोकाँ जोगदंड, गायकवाड, पोलीस मित्र निलेश लाड हे घटनास्थळी पोहचले़ मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला़ सुरुवातीला या मृतदेहाची ओळख पटली नव्हती़ मात्र एक ते दीड तासानंतर हा मृतदेह गणेश भिकाजी खरात (३७, रा़ खानापूर फाटा प्रियदर्शनी नगर, परभणी) यांचा असल्याचे स्पष्ट झाले, असे एएसआय शफीयोद्दीन यांनी सांगितले़ मयताच्या नातेवाईकांशी संपर्क झाला असून, रात्री १०़३० वाजेच्या सुमारास नातेवाईक दवाखान्यात दाखल झाले होते़ दरम्यान, गणेश खरात यांचा मृत्यू नेमका कोणत्या रेल्वे गाडीखाली आल्याने झाला, याची माहिती मिळू शकली नाही़ नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी पुढे गेल्यानंतर हा मृतदेह आढळला़ एवढीच माहिती पोलिसांकडे आहे़ पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती़