वेतन नाही, तर काम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST2021-09-15T04:22:43+5:302021-09-15T04:22:43+5:30
परभणी : महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन थकले असून, हे वेतन अदा न केल्यास २२ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन ...

वेतन नाही, तर काम नाही
परभणी : महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन थकले असून, हे वेतन अदा न केल्यास २२ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा परभणी शहर महानगरपालिका सफाई कामगार व कर्मचारी संघटनेने दिला आहे.
महानगरपालिकेतील कायम कर्मचारी, रोजंदारी कामगार, सफाई कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. वेतनाबरोबरच पेन्शन व इतर येणेदेखील मनपाकडे बाकी आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्नावर काही दिवसांपूर्वी मनपाने आश्वासन दिले होते; परंतु कुठल्याही मागणीची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचारी संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने लस घेणे बंधनकारक केलेले नाही. असे असताना ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, अशांचे वेतन देण्यात येऊ नये, असे आदेश मनपाने दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता २१ सप्टेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले नाही, तर २२ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सफाई कामगार व कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.के. आंधळे, अध्यक्ष अनुसयाबाई जोगदंड, सचिव के.के. भारसाकळे, कान्होबा तुपसुंदर, शंकर कसाब आदींनी दिला आहे.