सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अज्ञातावर खुनाचा गुन्हा, विजयाबाईंच्या फिर्यादीत पोलिसच जबाबदार; सीआयडीसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:40 IST2025-08-03T12:40:34+5:302025-08-03T12:40:51+5:30
माझ्या मुलाच्या मृत्यूस मोंढा पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचेही फिर्यादीत स्पष्टपणे म्हटले आहे.

सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अज्ञातावर खुनाचा गुन्हा, विजयाबाईंच्या फिर्यादीत पोलिसच जबाबदार; सीआयडीसमोर आव्हान
परभणी : अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मयताच्या आईने सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला. मात्र, यात आरोपी अज्ञात असून, ते शोधण्याचे आव्हान सीआयडीसमोर राहणार आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल होती. तिचा निकाल ३० जुलैला लागला. त्यानंतर सोमनाथची आई विजयाबाई यांच्या १८ डिसेंबर २०२४ च्या अर्जावरून नवा मोंढा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दुसरीकडे याच फिर्यादीत मयत सोमनाथचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी एका पोलिस अधिकाऱ्याने आमिष दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर नवा मोंढा पोलिस लॉकअपमध्ये पोलिसांनी सतत तीन दिवस मारहाण केल्यामुळे सोमनाथ यांचे निधन झाल्याचाही आरोप आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूस मोंढा पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचेही फिर्यादीत स्पष्टपणे म्हटले आहे.
पोलिसांच्या कोठडीत १५ डिसेंबरला झाला मृत्यू -
परभणीत १० डिसेंबरला संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशी शहरात आंदोलनादरम्यान तणाव निर्माण झाला होता. यात सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास नवा मोंढा पोलिस ठाण्यात नेले होते. यानंतर सोमनाथ सूर्यवंशी याचा १५ डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.
सोमनाथ यांना न्याय मिळावा यासाठी विजयाबाईंकडून ही सर्व न्यायालयीन लढाई स्वत: ॲड. आंबेडकर यांनी लढली. या न्यायाचे आणि लढाईचे श्रेय विजयाबाई सूर्यवंशी यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांना दिले.