जिवंत व्यक्तींना 'मृत' दाखवून शासनाचे लाखो रुपये लाटले; परभणीतील घोटाळ्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:25 IST2026-03-31T17:23:25+5:302026-03-31T17:25:01+5:30
पैसे परत करण्याच्या नोटीसमुळे लाभार्थ्यांचा पोलीस ठाण्यात धाव.

जिवंत व्यक्तींना 'मृत' दाखवून शासनाचे लाखो रुपये लाटले; परभणीतील घोटाळ्याने खळबळ
पूर्णा (जि. परभणी): तालुक्यातील धानोरा मोत्या गावात एक संतापजनक आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या 'बांधकाम कामगार कल्याणकारी' योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क सात जिवंत व्यक्तींचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे. हा प्रकार दोन-तीन वर्षांनी उघडकीस आल्यानंतर आता सरकारी कामगार विभागाने लाभार्थ्यांसह ग्रामसेवकांनाही नोटिसा बजावल्या आहेत, ज्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बनावट मृत्यू प्रमाणपत्रे जोडून लक्ष्मीबाई पांचाळ, कावेरी टाक, सुरेखा डरंगे यांच्यासह एकूण ७ जणांच्या नावे ही आर्थिक मदत लाटण्यात आली.
एजंटांचा जाळ आणि फसवणुकीचा 'ट्रॅप'
या घोटाळ्यामागे काही स्थानिक एजंट आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. पीडितांच्या म्हणण्यानुसार, "आधी आमचे आधार कार्ड आणि फोटो घेतले, काही साहित्यही दिले. त्यानंतर २ लाख रुपये मिळतील, त्यातील ५० हजार तुम्हाला आणि बाकी आम्हाला द्यावे लागतील," असे सांगून हा व्यवहार झाला. मात्र, ज्या कागदपत्रांच्या आधारे हा लाभ मिळाला, त्यात आपल्याला 'मृत' दाखवण्यात आले आहे, हे समजताच लाभार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
पोलीस ठाण्यात धाव अन् अधिकाऱ्यांचा हिसका
जेव्हा कामगार विभागाने घेतलेली रक्कम परत भरण्याच्या नोटिसा बजावल्या, तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. संतप्त पीडितांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नंदकुमार डाखोरे यांच्यासह चुडावा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत केनगे यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्ती जिवंत असल्याचे स्पष्ट झाले असून लवकरच दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
ग्रामपंचायतीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
धानोरा मोत्या ग्रामपंचायतीमध्ये या मृत्यूंची कोणतीही नोंद नसल्याचे ग्रामविकास अधिकारी वर्षा गिरे यांनी स्पष्ट केले आहे. तरीही ही बनावट प्रमाणपत्रे कशी तयार झाली आणि त्यावर कोणाच्या स्वाक्षऱ्या आहेत, याचा शोध आता सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड घेत आहेत. "नोटीसच्या उत्तरानंतर पुढची कडक कारवाई केली जाईल," असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.