रक्षाबंधनास निघालेली विवाहिता माहेरी पोहोचलीच नाही; मुलासह विहिरीत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:59 IST2025-08-14T11:58:48+5:302025-08-14T11:59:27+5:30
जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील घटना; पत्नी आणि मुलासोबत असलेला पती मात्र गायब

रक्षाबंधनास निघालेली विवाहिता माहेरी पोहोचलीच नाही; मुलासह विहिरीत आढळला मृतदेह
बामणी (जि. परभणी) : रक्षाबंधनासाठी पतीसमवेत पत्नी आणि मुलगा हे तिघेजण रविवारी सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा गावाकडून बामणी येथे विवाहितेच्या माहेरी येत होते. बामणीजवळील मानकेश्वर येथे बस बदलण्यासाठी तिघेही उतरले होते. मात्र, यानंतर तीन दिवसांनी यातील विवाहिता आणि तीन वर्षांचा मुलगा यांचा मृतदेह एका शेतातील विहिरीत तरंगताना आढळल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. यामुळे या मृत्यूबाबत आता शंका उपस्थित होत आहेत; तर पती मात्र गायब असल्याचे समोर आले.
याबाबत माहिती अशी की, बामणी येथील गोविंदराव जिजाराव जाधव यांची मुलगी शारदा हिचा विवाह जांभोरा (ता. सिंदखेडराजा) येथील भारत देशमुख यांच्यासोबत चार वर्षांपूर्वी झाला होता. शारदा भारत देशमुख (२७) हिला तीन वर्षांचा आदर्श नावाचा मुलगा होता. १० ऑगस्टला बामणी येथे अशोक गोविंद जाधव या भावाकडे रक्षाबंधनानिमित्त पती भारत देशमुख यांच्यासोबत येत असताना येलदरीनजीक माणकेश्वरपर्यंत शारदा देशमुख मुलासह आली होती. बामणीला येण्यासाठी बस बदलून यावे लागते; म्हणून माणकेश्वरला पती व मुलासह बसची वाट पाहत ते थांबले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी ग्रामस्थांना सांगितले. बस येण्यास उशीर होत असल्याने माणकेश्वर येथील महादेव मंदिरात ते तिघे दर्शन घेण्यासाठी गेले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, यानंतर विहिरीत १३ ऑगस्टला शारदा व तिचा मुलगा आदर्श यांचा मृतदेह अशोक काकडे या शेतकऱ्याच्या विहिरीत तरंगत असताना आढळून आला.
बामणी येथील ग्रामस्थांनी विवाहिता आपल्या गावची असावी म्हणून पाहावयास गर्दी केली होती. यानंतर दोघांचे मृतदेह विहिरीतून काढले असता त्यांची ओळख पटली. यात शारदा देशमुख आणि आदर्श देशमुख यांचे हे मृतदेह असल्याचे समोर आले. जिंतूर पोलिस ठाण्याला बामणी येथील दीपक देशमुख यांनी संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यावरून जिंतूर पोलिस ठाण्याचे स.पो.नि. बालाजी पुंड, जमादार दत्तात्रेय गुंगाणे, यशवंत वाघमारे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले व जागेवर डॉक्टरांच्या मदतीने शवविच्छेदन करण्यात आले आहे. अद्याप जिंतूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अंत्यसंस्कारानंतर गुन्हा नोंद करण्यात येईल, असे ग्रामस्थ, नातेवाइकांनी स्पष्ट केले.