पोलिसांच्या साक्षीने सोयरीक अन् नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:34+5:302021-09-13T04:17:34+5:30
भास्कर लांडे पालम : एकमेकांवर जिवापाड प्रेम, मात्र नातेवाइकांचा विरोध... लग्न तर करायचे; पण त्यासाठी अडचणींचा डोंगर... अशा परिस्थितीत ...

पोलिसांच्या साक्षीने सोयरीक अन् नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न
भास्कर लांडे
पालम : एकमेकांवर जिवापाड प्रेम, मात्र नातेवाइकांचा विरोध... लग्न तर करायचे; पण त्यासाठी अडचणींचा डोंगर... अशा परिस्थितीत पळून जाणे हा एकमेव मार्ग... त्या दोघांनीही तसा निर्णयही घेतला आणि पळून जाण्याचा बेत आखून तयारी करीत असतानाच पोलिसांची बेरकी नजर या प्रेमीयुगुलावर पडली. मग काय पोलीस ठाण्यापासूनच सुरू झाला प्रवास... पोलिसांनीही समजदारीची भूमिका घेतली. नातेवाइकांची समजूत काढली. पोलिसांच्या साक्षीने आणि नातेवाइकांच्या उपस्थितीत ११ सप्टेंबर रोजी शुभमंगल उरकले... पोलीस ठाण्यापासून सुरू झालेला सहजीवनाचा प्रवास अखेर विवाहबंधनात अडकला. चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे घडलेला हा प्रकार तालुक्यात चांगलाच चर्चेत आला होता.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे शहरात गस्त घालत होते. दुपारी १ वाजता त्यांना बसस्थानकासमोर तरुण जोडपे संशयास्पदरीत्या वावरताना दिसून आले. लागलीच त्यांनी वाहन वळवून जोडप्याची विचारपूस केली. ते म्हणाले, ‘आमचे ऐकमेकांवर जिवापाड प्रेम असून घरच्या विरोधामुळे आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा बेत आखला आहे’. हे ऐकताच पोलिसांनी त्यांना वाहनात बसवून पालम ठाण्यात आणले. विचारपूसअंती पालम तालुक्यातील भय्यासाहेब रमेश वाव्हळे (२२) आणि पूर्णा तालुक्यातील मुंबर येथील अर्चना बाळासाहेब कस्तुरे (२०) अशी त्यांची नावे असल्याचे समजले. त्यांचे आई-वडील पालम तालुक्यातील जवळा येथील वीटभट्टीवर एकत्र काम करीत आहेत. येथील ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने दोघांनी ऐकमेकांना जीवनसाथी बनविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांच्या लग्नाला दोन्हीकडील नातेवाइकांनी विरोध दर्शविला. म्हणून हे प्रेमीयुगुल पुण्याला जाऊन विवाह करून संसार थाटण्याच्या बेताने पालमला आले होते. ही हाकीकत समजल्यानंतर पोलिसांनी दोन्हीकडील नातेवाइकांना तातडीने ठाण्यात बोलावून घेतले. प्रथमदर्शनी त्यांच्या प्रेमाला दोन्हीकडील नातेवाइकांनी मान्यता दिली नाही. मग पोलिसांना समुपदेशन करावे लागले. अखेरीस दोन्हीकडील नातेवाईक या दोघांच्या विवाहासाठी तयार झाले; परंतु आजच लग्न करण्याच्या निर्णयावर हे दोघेही ठाम होते. मग काय ! या दोघांपुढे कोणाचेही काहीही चालले नाही. शेवटी मुलाच्या मूळ गावी म्हणजे पालम तालुक्यातील जवळा पा. येथे रात्री विवाहाची तयारी सुरू झाली. पारंपरिक विवाहासारखा झगमगाट नसला तरी या दोघांच्या आनंदाला पारावार नव्हता. ते पाहून वाव्हळे व कस्तुरे कुटुंबाचा उत्साह वाढला. मोकळ्या आकाशाखाली दोन्ही नातेवाइकांच्या साक्षीने विवाह संपन्न झाला. विवाहाला सरपंच रावसाहेब खटिंग, माजी सभापती गणेशराव घोरपडे, बाबासाहेब ऐंगडे, वीटभट्टी मालक नानासाहेब पोळ, गणेश पोळ, गिरीश पोळ आदींनी सहकार्य केले. त्यांची उपस्थिती होती.
पोलिसांकडून दोन्ही नातेवाइकांचे मनपरिवर्तन
मुलगा आणि मुलीकडील नातेवाइकांना एकत्र आणण्याचे काम पालम पोलीस ठाण्यात केले. शिवाय, नातेवाइकांचे मनपरिवर्तन करून विवाहाला राजी केले. त्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे, फौजदार विनोद साने, सहायक पोलीस उपनिरीक्षक आगळे, जमादार दीपक केजगीर, वाहतूक पोलीस भंडारे यांनी परिश्रम घेतले.