बाईकवर रिल बनवणे आले अंगलट; झेंडावंदनासाठी जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा अपघात, दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 14:21 IST2023-01-26T14:20:05+5:302023-01-26T14:21:11+5:30
भीषण अपघात चार शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी

बाईकवर रिल बनवणे आले अंगलट; झेंडावंदनासाठी जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा अपघात, दोघे गंभीर
पाथरी ( परभणी): प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये झेंडावंदनासाठी जाताना चार विद्यार्थ्यांना धावत्या बाईकवर रिल्स बनवणे अंगलट आले आहे. बाईकवरील नियंत्रण सुटल्याने ऑटो सोबत भीषण अपघात झाला. यात चारही विद्यार्थी जखमी असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा भीषण अपघात आज सकाळी 6. 45 वाजेच्या दरम्यान पाथरी ते सोनपेठ मार्गावर शाळेच्या अगदी जवळ झाला.
पाथरी ते सोनपेठ रस्त्यावर श्री चक्रधर स्वामी खाजगी शाळा आहे. या शाळेत डाकूपिंप्री ता पाथरी येथील अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गावातील 9 व्या वर्गात शिकणारे चौघे स्वप्नील ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल महादू तिथे , योगानंद कैलास घुगे ,शंतनू कांचन सोनवणे सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास शाळेकडे निघाले होते. चौघे एकाच बाईकवर जात असताना रिल शूट करत होते. शाळेच्या जवळ आले असता एका हातात मोबाईल आणि एका हाताने बाईक चालवताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. याचवेळी समोरून येणाऱ्या पीकअप रिक्षाने बाईकवरील चौघांना उडवले. यात चौघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. आजूबाजूच्या नागरिकांनी लागलीच त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथे रवाना केले. दोघे अत्यवस्थ असून यातील एका विद्यार्थ्यास लातूर येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.
डर है किस बात का
एकाच गावातील चौघेही मित्र मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनासाठी गावातून निघाले. एकाच बाईकवर जात असताना चौघांनी डर है किस बात का, हम है तेरे साथ, या गाण्यावर एक रिल बनवली. त्यांचा अपघातापूर्वीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यानंतरच चौघांचा अपघात झाला. एकाच बाईकवर तेही रील बनवत जाणे चौघांच्या अंगलट आले आहे.