खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पोलीस कर्मचारी बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 18:07 IST2020-11-06T18:04:53+5:302020-11-06T18:07:23+5:30
शहरातील हडको परिसरातील सरगम कॉलनीतील रमा विठ्ठल सदावर्ते या महिलेचा खून झाल्याची घटना मागील महिन्यात घडली होती.

खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पोलीस कर्मचारी बडतर्फ
परभणी: महिलेच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेला पोलीस कर्मचारी संतोष जाधव यास सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी ५ नोव्हेंबर रोजी काढले आहेत.
शहरातील हडको परिसरातील सरगम कॉलनीतील रमा विठ्ठल सदावर्ते या महिलेचा खून झाल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. या प्रकरणात मयत महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी संतोष जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी कर्मचाऱ्यास अटक करुन त्याचा तपास केला. चौकशी दरम्यान या कर्मचाऱ्याने महिलेचा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणात पोलीस कर्मचारी संतोष जाधव यास सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काढला आहे.
तीन पोलीस निलंबित
अवैध धंदेचालकांशी आर्थिक फायद्यासाठी संबंध ठेवल्याचे उघड झाल्याने पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश ५ नोव्हेंबर रोजी काढले आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सय्यद उमर सय्यद अमीन, मुक्तारखाँ रतनखाँ पठाण आणि राजेश रमेशराव मस्के या तीन कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यातील अभिलेखानुसार मोटारसायकलवरुन गस्त घालण्याच्या कर्तव्यावर नेमले असताना प्रत्यक्षात नेमलेले कर्तव्य कधीच पार पाडले नाही. स्वत:च्या फायद्यासाठी व आर्थिक लाभासाठी अवैध व्यावसायिकांशी वारंवार संपर्कात राहून वेळोवेळी ठराविक रक्कम घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही न करता स्वत:ला गैरकायदेशीर धंद्यात सामील करुन घेतल्याचे आदेशात म्हटले आहे.