'आरडीएक्स स्फोट घडवू'; धमकीच्या ई-मेलने राज्यभर पोस्ट कार्यालये अलर्ट, प्रशासनाची धावपळ
By मारोती जुंबडे | Updated: March 25, 2026 14:30 IST2026-03-25T14:30:06+5:302026-03-25T14:30:30+5:30
१२:१० चा डेडलाईन फोल; धमकीच्या मेलने उडाली प्रशासनाची धावपळ

'आरडीएक्स स्फोट घडवू'; धमकीच्या ई-मेलने राज्यभर पोस्ट कार्यालये अलर्ट, प्रशासनाची धावपळ
परभणी: राज्यातील पासपोर्ट व टपाल कार्यालयांना आरडीएक्स बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल बुधवारी दुपारी प्राप्त झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली. दुपारी १२:१० वाजता सायनाईड मिश्रित १६ आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा गंभीर इशारा या मेलमध्ये देण्यात आला होता, त्यामुळे काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या पार्श्वभूमीवर परभणीसह राज्यातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये तात्काळ सतर्कता बाळगण्यात आली. अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालय परिसराची पाहणी करण्यात आली, तर काही ठिकाणी नागरिकांना बाहेर जाण्याचा सल्ला देण्यात आला. कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याचे निर्देश देत प्रशासनाने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली. परभणी प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली व संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. संबंधित वेळ उलटल्यानंतर कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा स्फोटाची घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तरीही, या प्रकारामुळे काही काळासाठी नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
तामिळनाडूतून मेल पाठविल्याचा अंदाज
दरम्यान, संबंधित ई-मेलची प्राथमिक तपासणी केली असता तो तामिळनाडू येथून पाठविण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, अशा प्रकारच्या खोट्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.