स्वस्तात सोने देण्याचे आमिष; लुटण्याच्या घटनेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST2021-03-24T04:15:42+5:302021-03-24T04:15:42+5:30
सोनपेठ : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वस्तात सोने देण्याच्या आमिष दाखवून लुटण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे दोन ...

स्वस्तात सोने देण्याचे आमिष; लुटण्याच्या घटनेत वाढ
सोनपेठ : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वस्तात सोने देण्याच्या आमिष दाखवून लुटण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यातील दुसरी घटना घडली आहे. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन या घटनांना आवर घालावा, अशी मागणी सोनपेठकरांच्या वतीने होत आहे.
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्याच्या बाहेरील व्यक्तीशी संपर्क करुन त्यांना विश्वासात घेऊन लूट केल्याच्या घटनेत तालुक्यात वाढ होत आहे. २३ ऑगस्ट २०२० रोजी हिंगोली येथील अशोक कुरील या व्यक्तीशी ओळख करुन त्यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील शिर्शी येथे बोलावून घेतले होते. तेव्हा त्यांच्याकडून ३ लाख रुपये लुटल्याची घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या घटनेत माहूर तालुक्यातील बारड येथील सागर राठोड या युवकाशी ओळख करुन त्यालाही गंगाखेड येथे बोलावून घेतले होते. त्यानंतर गंगाखेड तालुक्यातील गोविंदवाडी येथे नेऊन त्याच्याकडील ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना ३ जानेवारी २०२१ रोजी घडली होती. या दोन्ही घटनेत सापडलेले सोने विकण्याचे आमिष दाखविले होते. त्याच बरोबर गंगाखेड तालुक्यातील दत्तवाडी येथे १६ मार्च रोजी गडचिरोली तालुक्यातील गोकुळनगर येथील बाबूराव काटवे यास बोलावून घेत त्याच्याकडील १ लाख ४० हजार रुपयांची लूट केल्याची घटना घडली होती. या तिन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी २४ तासात अटक करत त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मात्र स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटण्याच्या घटनेत वाढ होत आहे.