लॉकडाऊनने वाढविले मुलांचे वजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST2021-03-24T04:15:44+5:302021-03-24T04:15:44+5:30
परभणी : मागील वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद राहिल्याने त्याचा विपरित परिणाम मुलांच्या वजन वाढीवर झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही ...

लॉकडाऊनने वाढविले मुलांचे वजन
परभणी : मागील वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद राहिल्याने त्याचा विपरित परिणाम मुलांच्या वजन वाढीवर झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही बाब चिंतेची असून, आता मुलांच्या आरोग्याकडे पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील वर्षी २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व व्यवहार विस्कळीत झाले होते. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्या पूर्ण क्षमतेने अजूनही सुरू नाहीत. त्यामुळे विद्यार्थी घरीच बसून आहेत. सकाळी उठणे, शाळेत जाणे आणि दुपारी घरी आल्यानंतर जेवण, सायंकाळच्या सुमारास मैदानावर जाऊन खेळणे, रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हा नित्यक्रम पार बिघडून गेला आहे. ऑनलाईनच्या निमित्ताने मोबाईल हातात आल्याने दिवसभर मोबाईल, टिव्ही आणि जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत शारीरिक हालचालीच राहिल्या नाहीत. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम वजन वाढण्यावर झाला आहे. ही समस्या आता जवळपास अनेक पालकांना सतावत आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या वेळेचे नियोजन करून देत त्यांच्या आहाराकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुलांनी हे करावे...
मुलांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यावे. नियमित सकाळी लवकर उठावे, रात्री लवकर झोपावे. शारीरिक हालचाली करण्यासाठी घरासमोरील मोकळ्या जागेत मैदानी खेळ खेळावेत. जेवणाच्या वेळा ठरवून त्याच वेळी जेवण करावे. मोबाईल, टिव्ही पाहण्याच्या वेळा निश्चित कराव्यात.
मुलांनी हे करू नये...
मोबाईल, टीव्हीचा अवास्तव वापर टाळावा, बेकरीचे पदार्थ, जंकफूड खाऊ नये, जास्तीत जास्त ७ तासांपर्यंतच झोप घ्यावी. तासन्तास एकाच ठिकाणी न बसता शारीरिक हालचाली वाढवाव्यात.
मैदानी खेळ बंद होऊन मोबाईल, टिव्हीचा अति वापर, सतत जंक फूड खाणे, परीक्षा, शाळा नसल्याने कमी झालेला तणाव, मोबाईलवर खेळण्याच्या निमित्ताने वाढलेले बैठक आणि आहारातील अनियमितपणा ही वजन वाढण्याची कारणे आहेत. त्यामुळे मुलांनी फिजिकल ॲक्टीव्हिटीज् वाढविल्या पाहिजेत. केवळ ऑनलाईन अभ्यासासाठीच मोबाईलचा वापर करणे आवश्यक आहे.
- डॉ.श्याम जेथलिया, बाल रोग तज्ज्ञ
लॉकडाऊनमुळे मुलांच्या सर्वच वेळापत्रकात अनियमितता आल्याने वजन वाढत आहे. त्याबरोबर जंकफूडचा अतिवापर होत आहे. विद्यार्थी दिवसभर घरीच असल्याने जंकफूड अधिक प्रमाणात खातात. झोपण्याची, आहाराच्या वेळा निश्चित नाहीत. त्यामुळे मुलांचे वजन वाढू शकते. तेव्हा मुलांनी नियमित योगासने केली पाहिजेत. सकस आहार घ्यावा.
डॉ. महेंद्र शर्मा, परभणी.