परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या, शेतकरी विरोधात विधानाचा निषेध
By मारोती जुंबडे | Updated: April 26, 2025 12:25 IST2025-04-26T12:10:58+5:302025-04-26T12:25:04+5:30
युवक कॉँग्रेस आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी चुन्याच्या डब्या फेकून केला निषेध

परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या, शेतकरी विरोधात विधानाचा निषेध
परभणी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या "एक रुपया पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी लावला चुना" या वक्तव्याचा तीव्र निषेध करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारावर अजित पवार यांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फेकल्या. या प्रकारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
शेतकऱ्यांमध्ये अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे संताप उसळला आहे. किसान सभेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी तसेच पिक विमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत काँग्रेस पक्षाचे आणि किसान सभेचे काही पदाधिकारी ताब्यात घेतले. दरम्यान, अजित पवार यांचा ताफा कोणतीही अडचण न येता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजित बैठकीसाठी पुढे मार्गस्थ झाला.