एका क्षणात संसार उद्ध्वस्त! यूपीच्या दाम्पत्याचा परभणीत आत्मघात; पतीचा मृत्यू, पत्नी वाचली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 19:16 IST2025-12-20T19:16:15+5:302025-12-20T19:16:41+5:30
पोट भरण्यासाठी परभणी गाठली, पण काळाने घातला घाला!

एका क्षणात संसार उद्ध्वस्त! यूपीच्या दाम्पत्याचा परभणीत आत्मघात; पतीचा मृत्यू, पत्नी वाचली
परभणी : शहरातील हाजी हमीद कॉलनी पारवा गेट भागात शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. यामध्ये उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या पती-पत्नीने किरायाच्या घरातील खोलीमध्ये एकत्रित गळफास घेतला. या घटनेत पतीचा मृत्यू झाला तर सुदैवाने पत्नी बचावली. या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. जखमी पत्नीवर परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रकाश भागुले गौतम (२४, रा.बहराईच, उत्तर प्रदेश, ह.मु.हाजी हमीद कॉलनी, पारवा गेट परभणी) असे मयताचे नाव आहे तर मनीषा प्रकाश गौतम (२१) असे उपचार सुरू असलेल्या पत्नीचे नाव आहे. प्रकाश गौतम हे दांपत्य उत्तर प्रदेशातील रहिवासी असून यातील पती परभणीत एका बेकरीमध्ये काम करीत होते. तर पत्नी गृहिणी आहेत. मागील तीन महिन्यांपासून हाजी हमीद कॉलनी भागात ते किरायाने वास्तव्यास होते. शनिवारी सकाळी अचानक या दांपत्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेतला. त्यात सुदैवाने पत्नी वाचली. मात्र, पतीचा मृत्यू झाला.
ही घटना उघडकीस आल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, कोतवालीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मनीषा गौतम यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. याप्रकरणी प्रकाश गौतम यांच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. पत्नीचा जवाब घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती सपोनि.विश्वजीत कासले यांनी दिली. तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंते करीत आहेत. मयताचा एक भाऊ पाथरी येथे वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले.