पत्नीचा मृत्यू होताच पती 'अॅम्ब्युलन्स आणतो' असे सांगून गायब; ४ दिवस मृतदेह रुग्णालयात पडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:49 IST2026-02-23T13:47:23+5:302026-02-23T13:49:05+5:30
साता जन्माची शपथ अन् अर्ध्या वाटेतच सोडली साथ! जालन्यातील 'त्या' मृत पत्नीची करुण कहाणी; पतीचा शोध सुरू

पत्नीचा मृत्यू होताच पती 'अॅम्ब्युलन्स आणतो' असे सांगून गायब; ४ दिवस मृतदेह रुग्णालयात पडून
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू: साता जन्माची साथ देण्याची शपथ घेऊन विवाहबद्ध झालेल्या एका पतीने, पत्नीचा मृत्यू होताच तिची साथ सोडल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जालना सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पिंकी मोहन शिरके (३५, रा. सेलू) यांचा मृत्यू होताच, 'अॅम्ब्युलन्स आणतो' असे सांगून गेलेला पती पुन्हा परतलाच नाही. शेवटी चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांनी आणि नगरपालिका प्रशासनाने या दुर्दैवी महिलेवर अंत्यसंस्कार केले.
अॅम्ब्युलन्सच्या बहाण्याने पलायन
सेलू येथील रहिवासी असलेल्या पिंकी शिरके यांना १६ फेब्रुवारी रोजी पती मोहन शिरके यांनी जालना सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान पिंकी यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी ही माहिती देताच, "मी प्रेत नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स घेऊन येतो," असे सांगून मोहन शिरके बाहेर पडले, ते कायमचेच गायब झाले.
नातेवाईकांचा पत्ता नाही, पोलिसांची धडपड
मुलगी बेडवर एकटीच पडून राहिल्याने डॉक्टरांनी पोलिसांना कळवले. पोलीस हवालदार कैलास जायभाये यांनी तातडीने सेलू गाठून नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सेलू पोलिसांच्या मदतीने सोशल मीडिया आणि बिट जमादारांमार्फत ही माहिती तालुकाभर पसरवण्यात आली, मात्र एकही नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी पुढे आला नाही.
अखेर प्रशासनानेच दिले अग्नी
शुक्रवारी (२० फेब्रुवारी) मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. ताप आणि मानेच्या आजारामुळे पिंकी यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. मृतदेहाची विटंबना होऊ नये म्हणून पोलिसांनी नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला. अखेर दुपारी ३ वाजता रामतीर्थ स्मशानभूमीत पालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि पोलिसांनी माणुसकीच्या नात्याने पिंकी शिरके यांच्यावर अंत्यसंस्कार उरकले.
आरोग्य यंत्रणेच्या त्रुटीवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेतील त्रुटीही समोर आल्या आहेत. रुग्ण दाखल करताना सोबत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल नंबर किंवा आधारकार्डची नोंद का घेतली गेली नाही? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर या नोंदी वेळेवर झाल्या असत्या, तर कदाचित पतीने असे पळ काढण्याचे धाडस केले नसते.