परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या गाडीवर कर्जमाफीसाठी शाई फेकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:00 IST2025-11-01T17:57:49+5:302025-11-01T18:00:06+5:30
गंगाखेडात घडला प्रकार; पोलिसांची कमालीची गोपनीयता

परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या गाडीवर कर्जमाफीसाठी शाई फेकली
गंगाखेड (जि. परभणी) : परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर या जनता दरबाराच्या निमित्ताने शहरात आल्या असता ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:३५ वाजता कार्यक्रम स्थळी प्रवेशद्वारावर शासकीय वाहनावर दोघांनी शाईफेक केली. कर्जमुक्तीची फसवी घोषणा, अतिवृष्टी अनुदान मिळण्यास विलंब व पीकविमा न मिळाल्याच्या रोषातून हे कृत्य करणाऱ्या दोघांना क्षणात पोलिसांनी ताब्यात घेत घडलेल्या घटनेविषयी गोपनीयता पाळली. शुक्रवारी सायंकाळी संबंधित दोघांना जेवण्यासाठी पोलिसांनी सोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पालकमंत्री मेघना बोर्डीकर या गंगाखेड शहरात गुरुवारी परळी रोड येथे जनता दरबार कार्यक्रमासाठी जात होत्या. दरम्यान, या कार्यक्रमाच्या स्थळी प्रवेश करत असताना गाडी नंबर एचआर ९८ डब्ल्यू ३४५६ या शासकीय वाहनावर योगेश भगवानराव फड (वय ३८, रा. खादगाव ह. मु. संत जनाबाई नगर, गंगाखेड) व दीपक शिवराम फड (वय ३५, रा. खादगाव) या दोघांनी राज्य सरकार शेतकऱ्यांवर करत असलेल्या अन्यायाच्या संतापातून शाईफेक केली. गंगाखेड पोलिसांनी दोघांनाही क्षणार्धात ताब्यात घेतले असून, शुक्रवार सायंकाळपर्यंत दोघेही पोलिसांच्या ताब्यात होते.
या घटनेची नोंद गंगाखेड पोलिस ठाण्यात झाली आहे. दोघांपैकी एकाने त्यांच्या बॉटलमधील काळ्या रंगाचे द्रव्य पदार्थ (शाई) पालकमंत्र्यांच्या गाडीवर फेकले व दुसऱ्याने हातामध्ये रेड ऑक्साइड स्ट्राइक हाय ग्लोसचा डब्बा गाडीवर फेकल्याचे म्हटले. याप्रकरणी दोघांविरूद्ध कलम ११८ (१), १२५, २२१, ६२, ३ (५) भारतीय न्याय संहिताप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी दिली.
कर्जमाफीसाठी पालकमंत्र्यांवर शाईफेकीचा प्रयत्न
पालकमंत्री मेघना बोर्डीकर जनता दरबाराच्या निमित्ताने गंगाखेडला आल्या असता, कार्यक्रमस्थळी त्यांच्या शासकीय वाहनावर दोघांनी शाई फेकली होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शेतकऱ्यांच्या भावना मी समजू शकते : बोर्डीकर
शाई फेकण्याचा प्रकार हा शेतकऱ्यांच्या भावनेचा विषय आहे. ही भावना मी समजू शकते. यामध्ये वाईट वाटण्यासारखे काहीच कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. ३१ हजार ६०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. गंगाखेड तालुक्यात तर ८३ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. परभणी जिल्ह्यासाठी ४२० कोटी रुपयांचे तातडीच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विरोधी पक्षातील मंडळी असे प्रकार करतात. यामुळे काही फरक पडत नाही. मूळ शेतकरी अत्यंत समाधानी असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री बोर्डीकर यांनी 'लोकमत'ला दिली.