काँग्रेसमध्ये 'इनकमिंग'! माजी आमदार बाबाजानी दुर्राणींच्या प्रवेशाने परभणीत नवं राजकीय वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:29 IST2025-08-07T15:29:26+5:302025-08-07T15:29:57+5:30
महाविकास आघाडीला दिलासा; पाथरीचे माजी आ. दुर्राणी यांनी एकदा विधानसभा तर दोनदा विधान परिषदेवर आमदारकी गाजविली आहे.

काँग्रेसमध्ये 'इनकमिंग'! माजी आमदार बाबाजानी दुर्राणींच्या प्रवेशाने परभणीत नवं राजकीय वळण
परभणी : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमधील पक्षप्रवेशाचा सोहळा ७ ऑगस्ट रोजी दुपारी मुंबईत टिळक भवन येथे पार पडला. त्यांच्यासमवेत जिल्ह्यातील अनेक माजी जि.प. सदस्य, माजी नगरसेवकही काँग्रेसमध्ये दाखल झाले.
पाथरीचे माजी आ. दुर्राणी यांनी एकदा विधानसभा तर दोनदा विधान परिषदेवर आमदारकी गाजविली. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला होता. मात्र तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढली. पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गट जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे प्रवेश मिळण्यास विलंब होत होता. तोपर्यंत काँग्रेसचे माजी आ. सुरेश वरपूडकर हे भाजपमध्ये गेले. त्यामुळे दुर्राणी यांना काँग्रेसचा नवा पर्याय उपलब्ध झाला. अखेर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. समर्थकांनीही साथ दिल्याने ७ ऑगस्ट रोजी त्यांचा मुंबईत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री अमित देशमुख, माजी खासदार हुसेन दलवाई, अतुल लोंढे, तुकाराम रेंगे पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे.
दुर्राणी यांच्यासमवेत आलमगीर खान, सुभाष कोल्हे, नारायण आढाव, विजयकुमार सीताफळे, दत्तराव मायंदळे, जुनैद खान दुर्राणी, कलीम अन्सारी, नितेश भोरे, एम.ए. मोईज अन्सारी, श्याम धर्मे, अमोल बांगड, आनंद धनले, संदीप टेंगसे, अशोक अरबाड अशा अनेक माजी जि.प. सदस्य, माजी नगरसेवक, बाजार समिती संचालक व इतरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसला आलेली मरगळ झटकण्यासाठी हा नवा चेहरा उपयुक्त ठरेल, अशी काँग्रेसला आशा आहे. पदाधिकारी निवडीत काय व कशी संधी मिळते? यावरही बरेच अवलंबून आहे. मात्र काँग्रेसच्या या पडत्या काळात दुर्राणी यांचे इनकमिंग झाल्याने काँग्रेसची मंडळी आनंदली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची गणिते लावली जात आहेत.