सोनपेठमध्ये शाळेतील टॉयलेटमध्ये चिमुकलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 17:57 IST2024-10-08T17:55:38+5:302024-10-08T17:57:29+5:30

सोनपेठ शहरात ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार; पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद

In Sonpeth, it is revealed that a little girl who came home from kindergarten was abused, a case has been registered | सोनपेठमध्ये शाळेतील टॉयलेटमध्ये चिमुकलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

सोनपेठमध्ये शाळेतील टॉयलेटमध्ये चिमुकलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

- सुभाष सुरवसे
सोनपेठ (जि. परभणी) :
शहरातील एका इंग्रजी शाळेमध्ये बालवाडीत शिकणाऱ्या एका ५ वर्षीय मुलीवर शाळेतील स्वच्छतागृहात अत्याचार करण्यात आल्याची घटना ५ ऑक्टोबरला घडली होती. या प्रकरणी ७ ऑक्टोबरला सोनपेठ पोलिस ठाण्यात पोक्सो व इतर कलमांखाली आरोपीवर गुन्हा नोंद झाला आहे. बेलापूर आणि माजलगाव येथे शाळेतच चिमुकलीवर अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर आता शहरात देखील अशीच घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलगी सोनपेठ शहरातील एका इंग्रजी शाळेमध्ये बालवाडीत शिकण्यास आहे. ५ ऑक्टोबरला सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी आली. यावेळी मुलीला सरळ बसता येत नव्हते. आईने चौकशी केल्यावर पीडितेच्या अंगावर ओरखडल्याचे दिसून आले. त्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलीवर अत्याचार झाल्याचे पुढे आले. 

त्यानंतर संबंधित मुलीच्या आईने थेट सोनपेठ पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील, पोलिस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड आदींनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सबंधित घटनेची सत्यता तपासणी करण्यासाठी वेगवेगळे ६ पथक तयार करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

Web Title: In Sonpeth, it is revealed that a little girl who came home from kindergarten was abused, a case has been registered