आमच्या लेकराला काठी बी लागली तर महाराष्ट्रातील रस्ते बंद पडतील: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:40 IST2025-08-14T12:40:12+5:302025-08-14T12:40:30+5:30
परभणीत मनोज जरांगे साधताहेत मराठा समाजाशी संवाद

आमच्या लेकराला काठी बी लागली तर महाराष्ट्रातील रस्ते बंद पडतील: मनोज जरांगे
परभणी : आम्ही आमच्या लेकरांसाठी आरक्षण मागतोय. २७ तारखेला मराठे मुंबईकडे निघणार आहेत. २९ रोजी मुंबईत समुद्रासारखी ताकद दाखवू. आमच्या लेकराला काठी लागली तर महाराष्ट्रातील सगळे रस्ते बंद पडतील, असा इशारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी दिला.
परभणी जिल्ह्यात संवाद यात्रेनिमित्त ते दाखल झाले आहेत. त्यांनी विविध ठिकाणी गाठीभेटी बैठका घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सरकार दंगल घडवून आणणार असेल तरी आम्ही तसे होऊच देणार नाही. मुंबईत पण जाणार आहे. अतिशय शांततेत तेथे जाणार आहोत. आम्हाला मुंबईत आमच्या मागण्यांसाठी जाण्याचा अधिकार आहे. आता मराठे खवळून उठले. सरकारने मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला; पण समाज सोबत असल्याने मी भीत नाही. २७ ऑगस्टला आम्ही अंतरवालीतून निघतो. २९ रोजी आम्हाला मुंबईत जर त्रास दिला. काठी बी जरी लावली तर महाराष्ट्रातील एकही रस्ता चालू द्यायचा नाही. यावेळी आमचा लढा यशस्वी होईल. आरक्षणाचा गुलाल उधळूनच परत येणार असल्याचे जरांगे यांनी ठामपणे सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
हाकेंना मोजीत नाही
बीड जाळले. आता मुंबई जाळायची का? असे लक्ष्मण हाके म्हणाल्याबाबत विचारल्यावर जरांगे म्हणाले, त्यांना मी मोजीत नसतो. महत्त्व कुणाला द्यायचे, कुणाला नाही द्यायचे ते माणसाला कळले पाहिजे. त्याने स्वतःच्या जातीचे बघावे, किती हाल आहेत त्यांचे. त्यांच्या आरक्षणाचे बघावे, त्यांच्या आरक्षणासाठी भांडाव. मराठे, धनगर ओबीसीमध्ये वाद होतील, असे वागू नये.