'पिस्तुल असती तर...'; राष्ट्रवादी आमदार बाबाजानी दुर्राणींना मारहाण करून धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 17:21 IST2021-11-18T17:21:13+5:302021-11-18T17:21:51+5:30
Babajani Durrani : स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात उपस्थित असताना अचानक मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी

'पिस्तुल असती तर...'; राष्ट्रवादी आमदार बाबाजानी दुर्राणींना मारहाण करून धमकी
पाथरी ( परभणी ) : एका अंत्यसंस्कार कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani ) यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आ. दुर्राणी यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार बाबाजानी दुर्राणी हे आज एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात उपस्थित होते. याच ठिकाणी मोहम्मद बिन किलेब देखील आला होता. दरम्यान, आ. दुर्राणी हे दत्ताराव मायंदळे व बख्तियार खान व जुबेर बिन हावेल यांच्यासोबत वार्तालाप करत होते. योगायोगाने मोहम्मद बिन किलेब आणि आ. दुर्राणी समोरासमोर आले. यावेळी अचानक मोहम्मद बिन किलेब याने दुर्राणी यांच्यावर हल्ला केले. त्यांना मारहाण केली. नागरिकांनी हस्तक्षेप करत लागलीच त्याला पकडले. यावेळी त्याने 'माझ्याकडे पिस्तुल असते तर आताच गोळ्या घातल्या असत्या, अशी धमकी आ. दुर्राणी यांना दिली.
दरम्यान, आ. दुर्राणी यांनी मोहम्मद बिन किलेब याच्या विरोधात पाथरी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. यावरून गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीला तत्काळ अटके करण्यात यावी, अशी मागणी करत आ. बाबाजानी दुर्राणी समर्थकांनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली होती. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडून काही काळ तणाव निर्माण झाला होता.