छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती, सासूला सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 16:53 IST2020-12-02T16:52:53+5:302020-12-02T16:53:24+5:30
सात महिन्यांची गर्भवती असताना ५ फेब्रुवारी २०१५ रोजी राहत्या घरी जळून मरण पावली.

छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती, सासूला सक्तमजुरीची शिक्षा
परभणी : विवाहितेचा छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासूला न्यायालयाने एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
परभणीच्या न्यायालयाने १ डिसेंबर रोजी हा निकाल दिला. मानवत तालुक्यातील रसिकाबाई सटवाजी ढवळे यांची मुलगी पूजा हिचा विवाह सावरगाव (ता.मानवत) येथील अमोल भागोजी एडके याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी अमोल आणि पूजाची सासू कांताबाई भागोजी एडके यांनी घर बांधण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी पूजा हिच्याकडे केली. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला. या छळाला कंटाळून पूजा ही सात महिन्यांची गर्भवती असताना ५ फेब्रुवारी २०१५ रोजी राहत्या घरी जळून मरण पावली. या प्रकरणी रसिकाबाई ढवळे यांच्या फिर्यादीवरुन छळ करणे आणि मरणास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन पती अमोल व सासू कांताबाई यांच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
तपासी अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक अविनाश खंदारे यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एम. पाटील यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता आनंद गिराम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. मनाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण यांनी काम पाहिले.
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर न्या.एस.एम. पाटील यांनी छळ केल्याच्या प्रकरणात आरोपी पती अमोल व सासू कांताबाई यांना दोषी सिद्ध करीत प्रत्येकी एक वर्षाची सक्तमजुरी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन तीन वर्ष सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.