काळजाचा ठोका चुकला! जिंतूरमध्ये पुलावरून दुचाकीस्वार थेट २० फूट पुलाखाली फेकला गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:48 IST2026-02-05T18:47:45+5:302026-02-05T18:48:46+5:30
अकोली पुलावरून दुचाकी थेट २० फूट खाली पाण्यात कोसळली; युवक गंभीर जखमी

काळजाचा ठोका चुकला! जिंतूरमध्ये पुलावरून दुचाकीस्वार थेट २० फूट पुलाखाली फेकला गेला
जिंतूर (जि. परभणी): जिंतूर-जालना महामार्गावरील अकोली पुलाजवळ मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. दुचाकीवरील ताबा सुटल्याने ३२ वर्षीय युवक दुचाकीसह थेट १५ ते २० फूट खाली पुलाच्या पात्रातील पाण्यात कोसळला. फेरोज खान इब्राहिम खान पठाण (रा. बामणी प्लॉट, जिंतूर) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, फेरोज खान हा आपल्या दुचाकीवरून जिंतूरच्या दिशेने येत होता. अकोली पुलाजवळ पोहोचल्यावर अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. पुलाच्या कठड्याला धडकून तो दुचाकीसह थेट खाली पाण्यात कोसळला. उंचावरून पडल्यामुळे आणि काही वेळ पाण्यात अडकल्यामुळे तो अंशतः बेशुद्धावस्थेत होता.
तातडीने उपचार सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत फेरोजला बाहेर काढून तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांत कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही.