'तीन मुली झाल्या, तुला मुलगा का होत नाही'; छळाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 19:31 IST2023-04-04T19:31:32+5:302023-04-04T19:31:54+5:30
या प्रकरणी सासरच्या तिघांविरुध्द पूर्णा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'तीन मुली झाल्या, तुला मुलगा का होत नाही'; छळाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
- गजानन नाईकवाडे
ताडकळस (जि.परभणी) : तीन मुली झाल्या, तुला मुलगा का होत नाही या कारणाने सासरच्या मंडळीकडून सतत होत असलेल्या जाचाला कंटाळून एका तेहतीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना पूर्णा तालुक्यातील आव्हई येथे सोमवारी दुपारी उघडकीस आली.
रेखा गोविंद सोनवणे असे मयत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, रेखा आबासाहेब रासवे (रा.कोेक, ता.जिंतूर) यांचा विवाह सन २०१२ मध्ये पूर्णा तालुक्यातील आव्हई येथील गोविंद सोनवणे यांच्या सोबत झाला होता. लग्नानंतर रेखा यांना तीन मुली झाल्या. परंतू, मुलगा झाला नाही. त्यामुळे तुला मुलगा होत नाही, मुलीच होतात असे म्हणून सासरची मंडळी सारखा तगादा लावत जाच करत होती. या जाचास कंटाळून तीन एप्रिलला सकाळी रेखा यांनी शेताजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती कळताच पोलीस पाटील व ग्रामस्थांनी पूर्णा पोलीस ठाण्याला कळविली. त्यानंतर पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, सपोनि.गंगाधर गायकवाड, पोपलवार, रमेश मुजमुले, श्याम काळे, महिला उपनिरीक्षक राखोंडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदरिल मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा केला. याप्रकरणी मयत विवाहिता रेखा यांचा भाऊ अमोल रासवे याच्या फिर्यादीवरुन किशन सोनवणे, गोविंद सोनवणे, कमलबाई सोनवणे या तिघांविरुध्द पूर्णा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी पतीस अटक
घटनेनंतर आरोपी असलेल्या मयत विवाहितेच्या पतीस अटक करण्यात आली आहे. त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.गंगाधर गायकवाड हे तपास करीत आहेत.