परभणी जिल्ह्यात मृगाच्या पहिल्याच पावसाने दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:55 IST2020-06-11T11:54:58+5:302020-06-11T11:55:20+5:30
परभणी-गंगाखेड या मार्गावर पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद झाली होती.

परभणी जिल्ह्यात मृगाच्या पहिल्याच पावसाने दाणादाण
परभणी : जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून मृग नक्षत्राच्या पहिल्याच दमदार पावसाने परभणीकरांची दाणादाण उडविली आहे. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने परभणी-गंगाखेड या मार्गावर पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद झाली होती.
बुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. रात्री साधारणतः १०.३० च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. परभणी - गंगाखेड या रस्त्याचे काम सुरू आहे. अनेक भागात पुलाची कामे होत आहेत. पर्यायी वळण रस्ता न काढल्याने पुलाच्या परिसरात पाणी साचून वाहतूक ठप्प झाली होती. तसेच सेलू तालुक्यातील कुपटा गावाजवळील ओढ्याच्या पुलावर दोन फूट पाणी आल्याने या गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क रात्रभर तुटला होता.
दरम्यान, जिल्ह्यात सरासरी ३३ मिमी पाऊस झाला असून, त्यात मानवत तालुक्यात सर्वाधिक ६१.३७ मिमी, पाथरी आणि परभणी तालुक्यात प्रत्येकी ४८मिमी, पालम २३.६७, पूर्णा २३.२०, गंगाखेड २१.७५, सोनपेठ २६, सेलू ३२.२० आणि जिंतूर तालुक्यात १८मिमी पावसाची नोंद झाली आहे.