परभणीत मध्यरात्री तीन दुकानांना भीषण आग, संपूर्ण साहित्य जळून खाक, लाखोंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:17 IST2025-08-22T13:16:49+5:302025-08-22T13:17:57+5:30
दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

परभणीत मध्यरात्री तीन दुकानांना भीषण आग, संपूर्ण साहित्य जळून खाक, लाखोंचे नुकसान
परभणी : शहरातील दत्तनगर गणपती चौक भागात गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. ही बाब परिसरातील रहिवाशांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी त्वरित मनपाच्या अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. मध्यरात्री दोनच्या सुमारास लागलेल्या आगीच्या घटनेत जवळपास तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले. दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दत्तनगर, गणपती चौक भागात मध्यरात्री दोनच्या सुमारास मोबाईल शॉपी जनरल स्टोअर आणि ब्युटी पार्लर अशा तीन दुकानांना आग लागली. एका दुकानाला लागलेली आग अन्य ठिकाणी पसरल्यामुळे सर्व दुकानातील साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती परिसरातील अजित निंबाळकर यांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन अधिकारी ज्ञानेश्वर राठोड, अग्निशमन जवान मदन जाधव, सय्यद नजीम, वसीम अखिल अहमद हे दाखल झाले. त्यांनी काही वेळात आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेत मोठ्या प्रमाणावर साहित्याचे नुकसान झाले. नागरिकांची सतर्कता सुद्धा या घटनेनंतर कामी आले आणि यंत्रणेला वेळीच मदत कार्य करता आले.