डॉक्टर लेन भागात दुकानाला आग; परभणी शहरातील घटना : अग्निशमन यंत्रणा दाखल
By राजन मगरुळकर | Updated: November 19, 2025 00:01 IST2025-11-19T00:01:37+5:302025-11-19T00:01:57+5:30
स्टेशन रोड परिसरात डॉक्टर लेन भागात कपडा होजियारी दुकाने सोबतच काही इतर छोटी मोठी दुकाने व्यापारी संकुलामध्ये आहेत.

डॉक्टर लेन भागात दुकानाला आग; परभणी शहरातील घटना : अग्निशमन यंत्रणा दाखल
- राजन मंगरूळकर
परभणी : शहरातील स्टेशन रोड डॉक्टर लेन परिसरात एका दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नसले तरी आजूबाजूच्या काही दुकानांना सुद्धा या आगीचा धोका निर्माण झाला आहे.
स्टेशन रोड परिसरात डॉक्टर लेन भागात कपडा होजियारी दुकाने सोबतच काही इतर छोटी मोठी दुकाने व्यापारी संकुलामध्ये आहेत. यातील एका हॉटेल समोर असलेल्या दुकानाला ही आग लागली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानासह वाहन आग आटोक्यात आणण्यासाठी दाखल झाले. दरम्यान या परिसरात दुकानाच्या बाजूला काही दुकाने आहेत तर लागूनच एक विद्युत रोहित्र सुद्धा आहे. तातडीच्या उपाययोजना म्हणून विद्युत रोहित्रावरील वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात आला आहे.
घटनास्थळी नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्यासह कर्मचारी दाखल झाले आहेत. दरम्यान मनपाचे अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी राठोड यांच्यासह वाहन चालक जवान यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी युवकांसह नागरिकांची सुद्धा गर्दी झाली होती. अजून काही दुकानांना आग लागू नये, यासाठी यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत. अजूनही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरूच आहे. आजूबाजूच्या काही दुकानांना सुद्धा आगीची धग पोहोचल्याचे समोर आले आहे.