सेलू तालुक्यात पाण्याअभावी पंधरा नळयोजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 19:03 IST2019-03-20T19:01:51+5:302019-03-20T19:03:02+5:30
स्ञोत कोरडे पडल्याने भीषण पाणीटंचाई

सेलू तालुक्यात पाण्याअभावी पंधरा नळयोजना बंद
सेलू (परभणी ) : जमिनीतील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असून पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी कोरड्या पडत आहेत. यामुळे तालुक्यातील पंधरा गावातील नळ योजना बंद पडल्या आहेत.
तालुक्यात नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली होती. मार्च महिन्यात अधिकच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावातील पाणी पुरवठा योजना मोडकळीस आला आहेत. तरी काही गावातील योजना कालबाह्य झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीला कसरत करावी लागत आहे.
वाकी, तांदुळवाडी, कुपटा, म्हाळसापुर, निपाणी टाकळी, डासाळा, या गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी कोरड्या पडल्या तसेच योजना ही कालबाह्य झाल्याने या गावातील ग्रामस्थांना हातपंप व इतर पाणी स्ञोतावरून तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. डिग्रस खू, डिग्रसवाडी, या येथील नळयोजना किरकोळ दुरूस्ती अभावी बंद आहे. तर गोहेगाव व हिस्सी ची योजना पाणी नसल्याने बंद पडली आहे. कवडधन, शिंदे, टाकळी, गव्हा येथील स्ञोत कोरडे पडले असून योजना कालबाह्य झाली आहे. दरम्यान,पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी कोरड्या पडत असल्याने पाणी असलेले स्ञोत अधिग्रहण करून दहा गावातील जनतेची तहान भागविणाचा प्रयत्न केला जात आहे. तसेच चार गावातील टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले आहेत.
चौदा गावाला नळयोजनाच नाही
सेलू तालुक्यात 82 ग्रामपंचायती असून 78 गावांत नळयोजना आहेत. त्यातील 63 गावातील योजना सुरू आहेत पंरतू चार ते आठ दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती आहे. तालुक्यातील 14 गावात नळयोजनाच नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.