शेतकऱ्यांना युरिया मिळेना, दुसरीकडे ट्रकभरून खत दुसऱ्या जिल्ह्यात विक्रीला नेताना पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:19 IST2025-12-09T12:19:04+5:302025-12-09T12:19:43+5:30
पाथरीत अवैधरित्या युरियाची वाहतूक करणारा ट्रक पकडला; चालकासह मानवतच्या ‘महेश कृषी सेवा केंद्र’ मालकावर गुन्हा दाखल

शेतकऱ्यांना युरिया मिळेना, दुसरीकडे ट्रकभरून खत दुसऱ्या जिल्ह्यात विक्रीला नेताना पकडला
- विठ्ठल भिसे
पाथरी : मानवत शहरातील एका कृषी दुकानदाराच्या गोडाऊनमधील २५० युरिया खताच्या बॅगा अवैधरित्या जालना जिल्ह्यात घेऊन जाणारा ट्रक 8 डिसेंबर रोजी पाथरी ते आष्टी रस्त्यावर पकडण्यात आला. या प्रकरणी ट्रक चालक व कृषी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी दबाव गटाचे प्रमुख रामप्रसाद बोराडे (रा. सेलू) हे पाथरी–आष्टी रस्त्यावरून जात असताना ट्रक संशयास्पद दिसला. त्यांनी ट्रक थांबवून भरारी पथकाला माहिती दिल्यानंतरच कारवाई सुरू झाली. दरम्यान, पाथरी येथील कृषी अधिकारी (गुण नियंत्रक ) एस. एम. फुलपगार यांनी या बाबत पाथरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला माहिती मिळाली होती की, परभणी जिल्ह्यासाठी पुरवठा केलेले खत एका ट्रकमधून जालना जिल्ह्यात नेला जात आहे. या माहितीच्या आधारे पाथरी येथील कृषी अधिकारी फुलपगार सारोळा शिवारात थांबले. संशयास्पद ट्रक (MH 46 F 2388 ) दिसताच थांबवून चौकशी करण्यात आली. दरम्यान, ट्रक चालक समीर शेख (रा. छत्रपती संभाजीनगर) याने ट्रकमध्ये युरिया खत असल्याचे कबूल केले.
250 बॅग सापडल्या, कागदपत्रांचा अभाव
घटनेची माहिती मिळताच जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख दीपक सामाले, जिल्हा गुणनियंत्रक गोविंद काळे, मानवत कृषी अधिकारी मनोज लांबडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या उपस्थितीत ट्रॅकची तपासणी केली असता २५० युरिया बॅग (प्रति बॅग ४५ किलो) सापडल्या. मात्र कोणतेही वैध परवाना अथवा कागदपत्र ट्रॅक चालकाकडे आढळून आले नाहीत, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. चालकाने चौकशीत सांगितले की हे खत महेश कृषी सेवा केंद्र, मानवत येथील गोडाऊनमधून घेऊन पाथरी तालुक्यातील काही गावांमध्ये पोहोचविण्यास सांगितले होते.
खत वाढीव दराने विक्रीचा संशय
भरारी पथकाने पंचनाम्यात नमूद केले की, हे खत वाढीव दराने विक्री अथवा औद्योगिक वापरासाठी परजिल्ह्यात नेले जात होते असा संशय आहे. या प्रकरणात कृषी दुकानाचे मालक पुरूषोत्तम दशरथलाल चांडक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यापूर्वी राजकीय दबावतंत्र?
सायंकाळी पंचनामा करून ट्रक पाथरी पोलीस ठाण्यात आणला असतानाही गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. यामागे राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, अशी चर्चा रंगली. कृषी दुकानदाराला कोण पाठबळ देत होते? असा प्रश्न उपस्थित.
शेतकऱ्यांना खत टंचाई, मात्र ट्रक भरून बाहेरगावी?
एकीकडे शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर मिळत नाही, कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते, तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यासाठीचे खत सर्रास जालना जिल्ह्यात औद्योगिक वापरासाठी पाठवले जाते. मोठ्या प्रमाणावर साठा असतानाही कृषी विभागाला याची माहिती होत नाही कशी? यातून साखळी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.