अंगावरून बैलगाडी गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; पाथरी तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 15:38 IST2021-05-24T15:37:36+5:302021-05-24T15:38:14+5:30
पाथरी तालुक्यातील तुरा येथील बाबासाहेब गायकवाड यांची गावाजवळ शेत जमीन आहे.

अंगावरून बैलगाडी गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; पाथरी तालुक्यातील घटना
पाथरी : शेतातून बाजरीचे सुरमाड घेऊन येत असताना खाली पडल्यानंतर बैलगाडी अंगावरून गेल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २३ मे रोजी सायंकाळी तालुक्यातील तुरा येथे घडली. बाबासाहेब संतराम गायकवाड ( 45 ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
पाथरी तालुक्यातील तुरा येथील बाबासाहेब गायकवाड यांची गावाजवळ शेत जमीन आहे. त्यांनी शेतात उन्हाळी बाजरीची लागवड केली होती. काही दिवसांपूर्वी बाजरी काढल्यानंतर त्याचे सुरमाड शेतात पडून होते. रविवारी सायंकाळी ते सुरमाड बैलगाडीतून त्यांनी गावातील घरी आणून टाकले. त्यानंतर उरलेले सुरमाड आणण्यासाठी ते परत शेतात गेले. पुन्हा गावाकडे परतत असताना अचानक बैलगाडीतून बाबासाहेब खाली पडले. काही कळायच्या आत बैलगाडीचे चाक त्यांच्यावरून गेले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. यानंतर परभणी येथे उपचारसाठी घेऊन जात त्यांचा मृत्यू झाला.