पाथरीत बनावट खत विक्रीचा गोरखधंदा; गोडाऊन सील, शेतकऱ्यांना फसवणाऱ्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:20 IST2025-06-17T18:19:58+5:302025-06-17T18:20:28+5:30

गेल्या काही महिन्यांपासून बोगस खत विक्रीचा  प्रकार सुरू असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.

Fake fertilizer sale racket in Pathri; Godown sealed, case registered against those who cheated farmers | पाथरीत बनावट खत विक्रीचा गोरखधंदा; गोडाऊन सील, शेतकऱ्यांना फसवणाऱ्यावर गुन्हा

पाथरीत बनावट खत विक्रीचा गोरखधंदा; गोडाऊन सील, शेतकऱ्यांना फसवणाऱ्यावर गुन्हा

- विठ्ठल भिसे
पाथरी (परभणी):
पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी शिवारातील एका गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद बनावट खताचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या विशेष पथकाने 16 जून रोजी येथे छापा टाकला. यावेळी पथकाने २ लाख ४० हजार रुपयांच्या बनावट खतांचा साठा असलेल्या ३१४ गोण्या जप्त केल्या. दरम्यान, याप्रकरणात कृषी अधिकारी यांच्या फिर्याफिवरून पाथरी पोलीस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बोगस खत विक्रीचा  प्रकार सुरू असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. 

पाथरी ते मानवत रस्त्यावर पोहेटाकळी शिवारात एका गोडाऊनमधून बनावट खतांची विक्री मागील काही महिन्यांपासून करण्यात येत होती. येथून मोठ्या प्रमाणावर बोगस खतांची विक्री होत असल्याची माहिती पाथरी येथील कृषीअधिकारी गोविंद लक्ष्मण कोल्हे यांना मिळाली. यावरून कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 16 जून रोजी त्रिमूर्ती ऍग्रो एजन्सीच्या पाठीमागील गोडाऊनवर छापा टाकला. पाहणी केली असता गोविंद बळीराम पवार (रा. आनंदनगर तांडा, ता. पाथरी) याच्याकडे विविध कंपन्यांची परवाना नसलेली, संशयित आणि रासायनिक खत सदृश वस्तू आढळून आल्या. या प्रकरणी वरिष्ठ कार्यालयाकडून दबाव वाढल्याने रात्री उशिरा एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शेतकऱ्यांची फसवणूक
पाथरी आणि मानवत भागात मोठ्या प्रमाणावर बोगस खत विक्री झाल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी थेट कृषी दुकानातून बनावट खत विक्री झाल्याचा संशय असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना थेट खत विक्री झाल्याचा प्रकार घडला आहे. यातून परिसरातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत असून, बनावट खतामुळे पीक उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता असून, आर्थिक नुकसानही होणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त केली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष का?
बिनबोभाटपणे बोगस खत विक्री होत असताना या प्रकाराकडे सोयीस्करपणे  कानाडोळा झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष बाब म्हणजे, हा प्रकार पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहचला होता मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे सांगितलं जातं आहे. तसेच बोगस खत विक्री करणाऱ्या सोबत कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा थेट संबंध असल्याची चर्चा आहे. त्याच्या आशीर्वादामुळेच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून चौकशीची मागणी केली आहे.

Web Title: Fake fertilizer sale racket in Pathri; Godown sealed, case registered against those who cheated farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.