शिक्षकाची नोकरी नको रे बाबा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:43+5:302021-09-13T04:17:43+5:30

परभणी : गेल्या काही वर्षांपासून अध्यापक विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उदासिनता पाहायला मिळत आहे. या विद्यालयातील क्षमतेच्या तुलनेत यावर्षी ...

Don't want a teacher's job, Dad ... | शिक्षकाची नोकरी नको रे बाबा...

शिक्षकाची नोकरी नको रे बाबा...

परभणी : गेल्या काही वर्षांपासून अध्यापक विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उदासिनता पाहायला मिळत आहे. या विद्यालयातील क्षमतेच्या तुलनेत यावर्षी निम्मे अर्ज आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर हमखास नोकरीचा मार्ग म्हणून डी. एड्. अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेश घेत होते. मात्र, हळूहळू डी. एड्. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आणि नोकऱ्या मिळणे दुरापास्त झाले. आतातर शिक्षक म्हणून नोकरीसाठी डी. एड्. उत्तीर्ण झाल्यानंतर टीईटी परीक्षा द्यावी लागते. तसेच बेरोजगार विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने विद्यार्थ्यांनी डी. एड्. अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून डी. एड्.च्या अनेक जागा रिक्त राहत आहेत.

नोकरीची हमी नाही

डी. एड्. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच मागील काही वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे डी. एड्. करुन बेरोजगार झालेल्या युवकांची संख्या अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी डी. एड्. अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली आहे. मागील काही वर्षांपासून क्षमतेएवढेही अर्ज येत नसल्याने विद्यालय बंद पडण्याची स्थिती आहे.

कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा

डी. एड्. अभ्यासक्रमासाठी मागील काही वर्षांपासून प्रवेश क्षमतेएवढेही अर्ज येत नाहीत. हे विद्यार्थी आता शासकीय सेवेत नोकरी मिळावी, यासाठी कला शाखेकडे वळले आहेत. कला शाखेमध्ये बी. ए. प्रशासकीय सेवा आणि एम. ए. लोक प्रशासन हे दोन विषय विद्यार्थ्यांकडून निवडले जात आहेत.

बी. ए. प्रशासकीय सेवा या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षेचीही तयारी करुन घेतली जाते. त्यामुळे पदवी प्रमाणपत्र तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी होत असल्याने अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळले आहेत, असे प्राचार्य डी. जी. सानप यांनी सांगितले.

Web Title: Don't want a teacher's job, Dad ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.