दहा लाखांची मदत नको, माझा मुलगा परत आणून द्या! सोमनाथच्या आईने फोडला टाहो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 16:41 IST2024-12-21T16:40:16+5:302024-12-21T16:41:23+5:30
माझ्या मुलाच्या बाबतीत जाणून बुजून आजाराचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप सोमनाथ याच्या आईने केला

दहा लाखांची मदत नको, माझा मुलगा परत आणून द्या! सोमनाथच्या आईने फोडला टाहो...
परभणी : मला दहा लाखांची मदत पाहिजे नाही, माझ्या मुलाच्या बाबतीत जाणून बुजून आजाराचे कारण पुढे केले जात आहे. सोमनाथ याने झालेल्या आंदोलनात कोणाला मारहाण केली, याची माहिती मला राज्य शासनाने द्यावी. त्याशिवाय मी येथून हलणार नाही, सोमनाथला पोलिसांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत सोमनाथ याची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी केला आहे. त्यांनी या मदतीला नाकारून मुलाच्या मृत्यूचे सत्य समोर यावे, यासाठी शुक्रवारी टाहो फोडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदन करताना सोमनाथला कोठडीत मारहाण झाली नसल्याचे म्हटले; तर पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करून अवाजवी बळाचा वापर झाला का, याची चौकशी करण्यात येईल, असेही सांगितले. विरोधकांचे मात्र त्यांच्या उत्तरावर समाधान झाल्याचे दिसले नाही. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधानाच्या प्रतिकृतीची अवमानना करणारा आरोपी पवार हा मनोरुग्ण असून त्याच्यावर २०१२ पासून उपचार सुरू आहेत. चार वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने तसा अहवाल दिला आहे. सकल हिंदू समाजाच्या मोचनिंतर पाच तासांनी संविधान तोडफोड घटना घडली. तो मोर्चात नव्हता, त्याच्या बहिणीच्या घरून आला होता. मोर्चाचा आणि या घटनेचा संबंध नाही. मात्र या मनोरुग्णामुळे शहराचे स्वास्थ्य बिघडले. बंददरम्यान जाळपोळ आणि हिंसाचार झाला. या प्रकरणी ५१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यांत ४२ पुरुष, ३ महिला, ६ अल्पवयीन होते. महिला आणि अल्पवयीन यांना नोटिस- देऊन सोडले. जे व्हिडीओ फुटेजमध्ये तोडफोडीत दिसले, अशांवरच कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांना दहा लाखांची मदत
जाळपोळीच्या व्हिडीओत दिसल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना दोन वेळा न्यायालयात उभे कैले, यावेळी सूर्यवंशी यांनी पोलिसांनी मारहाण केली नसल्याचे न्यायाधीशांना सांगितले; तर पोलिस कोठडीमधील फुटेज उपलब्ध आहे. तेथे कुठेही मारहाण केल्याचे दिसत नाही. वैद्यकीय तपासणीत त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या शरीरावर जुन्या जखमा आहेत, त्याचा उल्लेख आहे. त्यांना पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत नेले. सकाळी त्यांच्या सहकारी आरोपीने सूर्यवंशी यांना जळजळ होत असल्याचे सांगितले. तेव्हा रुग्णालयात नेले असता सोमनाथ यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या संपूर्ण प्रकरणात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणाची माजी न्यायमूर्तीमार्फत न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. तसेच सोमनाथच्या कुटुंबाला शासनाकडून १० लाखांची मदत देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांची चौकशी
मुख्यमंत्र्यांनी निवेदनाता म्हटले की, दुसऱ्या दिवशी बंददरम्यान बहुतांश आंदोलक शीततेत आंदोलन करत होते. हजारो लोक होते, मात्र केवळ दोन-तीनशे आंदोलकांनी जाळपोळ केली. सरकारी कार्यालयांचे नुकसान आहेच; पण सामान्यांचे १ कोटी ८९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याच दिवशी सायंकाळी मला वंचित'चे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांचा फोन आला. परभणीमध्ये कोंबिंग ऑपरेशन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मी लागलीच आयजींना फोन केला, तेव्हा केवळ व्हिडीओमध्ये दिसणाऱ्यांवर कारवाई आहे, कोंबिंग नसल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी आंदोलकांवर कारवाईदरप्यान वाजवीपेक्षा अधिक बळाचा वापर केला का? याची चौकशी करण्यात येईल. तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच वच्छलाबाई मानवते या महिलेला पोलिसांनी मारहाण केली, यावर फडणवीस म्हणाले की, त्या अतिआक्रमक होत्या. त्यांनी महिला पोलिसावर हल्ला केला. त्यामुळे पोलिसच सुरक्षित नसतील तर कसे जमणार? पोलिसांनी त्यांना गाडीत उचलून नेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.